पुराणानुसार महाराष्ट्राची भूमी ही संत-महात्म्यांची भूमी आहे. महाराष्ट्र हे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, संत जनाबाई, मुक्ताबाई, सोपानदेव इत्यादींचे जन्मस्थळ व कार्यस्थळ आहे. या संतांनी भक्तीमार्गाने समाजात जनजागृती केली. रामदास स्वामीही याच वर्गातील संत होते. रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी (ठोसर) होते. यावर्षी रामदास नवमी 15 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु : रामदास स्वामी लहानपणी खूप खोडकर होते. गावातील लोक त्यांच्या आईकडे रोज त्यांच्याबद्दल तक्रार करायचे. एके दिवशी आईच्या रागावण्यावरुन त्यांच्यामध्ये प्रचंड परिवर्तन झाले आणि त्यांनी ध्यान करणे सुरु केले. बालपणीच त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडले होते, म्हणूनच त्यांनी स्वतःला रामदास म्हणवून घेतले. त्यावेळी महाराष्ट्रात मराठा राजवट होती. रामदासजींच्या कार्याने शिवाजी महाराज खूप प्रभावित झाले होते.
पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले : रामदास स्वामी यांचा विवाह करण्याचा घाट कुटुंबियांनी घातला. मात्र, बोहोल्यावर उभे असताना सावधान शब्द ऐकताच ते नेसत्या वस्त्रानिशी मंडपातून पळून गेले. यानंतर त्यांनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी त्याकाळी प्रस्थापित केला. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून ते दररोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.
शिवाजी महाराजांचा काळ : समर्थांनी त्या काळात समर्थसंप्रदाय स्थापन करून १,१०० मठ स्थापन केले. सुमारे १,४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. माघ वद्य नवमीला तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून; समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हीच तिथी पुढे 'श्रीरामदास नवमी' म्हणून प्रसिद्ध झाली. म्हणूनच त्यांचे देशभरातील अनुयायी नवमी तिथीला 'दास नवमी' उत्सव म्हणून साजरी करतात. आयुष्याचा शेवटचा काळ त्यांनी साताऱ्याजवळील परळी किल्ल्यावर घालवला. या किल्ल्याचे नाव 'सज्जनगड' होते, तेथे त्यांची समाधी आहे.
- मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
- तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
- जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
- जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥