आग्रा Ram Mandir In Netherlands : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला श्रीराम मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पुजला जातो.
नेदरलॅंडमध्ये रामाची दोन मंदिरं बांधली : कानपूरच्या प्राध्यापिका आणि हिंदी युनिव्हर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा पुष्पिता अवस्थी यांनी नेदरलॅंडमध्ये रामाची दोन मंदिरं बांधली आहेत. त्या नुकत्याच आग्रा येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी नेदरलँडहून आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला. नेदरलँडमधील ही दोन राम मंदिरं अॅमस्टरडॅम शहराजवळील महामार्गावर आणि क्रोनिंग शहरात आहेत. विशेष म्हणजे, ही दोन्ही मंदिरं त्यांनी चर्च विकत घेऊन तेथील जागेवर बांधली आहेत. या मंदिरांमध्ये राम दरबार, शिव परिवार, दुर्गा माता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत.
दोन्ही मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते : पुष्पिता अवस्थी यांनी सर्वप्रथम अॅमस्टरडॅम शहरातील हायवेवर बागलगीर अपगौडो या ठिकाणी 12 वर्षांपूर्वी एक चर्च विकत घेऊन तेथे राम मंदिर बांधलं. तेव्हापासून येथे रामनामाचा सूर जागवला जातोय. यानंतर, 6 वर्षांपूर्वी त्यांनी क्रोनिंग शहरात आणखी एक चर्च खरेदी केलं आणि तेथे राम मंदिराची उभारणी केली. शनिवार आणि रविवारी या दोन्ही मंदिरांमध्ये चांगलीच गर्दी असते. भारतीय आणि अनिवासी भारतीय येथे पूजा आणि दर्शनासाठी येतात.
गीता आणि रामचरितमानसचं पठण : या दोन्ही मंदिरात गीता आणि रामचरितमानसचं पठण केलं जातं. यासोबतच मंदिरात भजन आणि कीर्तनंही होतात. दोन्ही मंदिरात बैठक कक्ष बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात. नवरात्रीमध्ये उपवासासह नऊ दिवस दांडिया आणि गरब्यासह देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या मंदिरात लग्नंही होतात. यासोबतच तेथे गेस्ट हाऊसही बांधण्यात आलं आहे.
चर्च रिकामी होत आहेत : नेदरलँडमध्ये चर्च मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचं पुष्पिता अवस्थी सांगतात. गेल्या 25 वर्षांत तेथील लोकांचा ख्रिश्चन धर्मावरील विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळे चर्च रिकामी होत आहेत. येथे चर्च चालवणंही कठीण होत आहे. त्यामुळे चर्चच्या विक्रीमुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत. याला कोणीही विरोध करत नाही, असं त्यांनी सांगितलं. या दोन्ही राम मंदिरात भारतीयांसोबत इतरही लोक येतात. यामध्ये डच लोकांचाही समावेश आहे.
हे वाचलंत का :