मुंबई - राखीपौर्णिमा हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे. हा सण रक्षाबंधन या नावानेही ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला (Raksha Bandhan 2023) समृद्धीसाठी, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याच्या हेतूने हा सण साजरा करतात. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून औक्षण करते.
या कालावधीत राखी बांधा - राखीपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. बहीण तीचे संरक्षण व्हावे अशी अपेक्षा करत भावाच्या हातात पवित्र राखी बांधते आणि भाऊ पण तिला आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. हा सण श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षी राखीपौर्णिमा 30 आणि 31 ऑगस्ट या दोन दिवशी आहे. पण भद्रकाळ असल्यामुळे 30 तारखेला रात्री 9 नंतर ते 31 तारखेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे या कालावधीत राखी बांधावी लागणार आहे.
काय आहे मुहूर्त - 30 ऑगस्टला पौर्णिमेची तिथी आहे. पण, त्यासोबत भद्रकाळ असल्यामुळे सण साजरा करणे निषिद्ध मानले जाते. हा भद्रकाळ सकाळी पौर्णिमा सुरू झाल्यापासून रात्री 09.02 वाजेपर्यंत आहे. त्यावेळेनंतरच राखी बांधने योग्य असणार आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 नंतर पौर्णिमा संपते. त्यामुळे ज्यांना सकाळी राखी बांधायची असेल त्यांना ती आधीच बांधावी लागणार आहे.
अशी बांधा राखी - असे सजवा ताट - रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि सूर्यदेवाला जल अर्पण करतात. त्यानंतर घराच्या मंदिरात किंवा जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा. देवाची पूजा केल्यानंतर राखी बांधण्यासंबंधीचे साहित्य गोळा करावे, ज्यात मुख्यतः चांदी, पितळ, तांबे किंवा स्टीलचे कोणतेही स्वच्छ ताट घ्या आणि त्यावर एक सुंदर स्वच्छ कापड पसरवा. त्या ताटात आपल्या पद्धतीप्रमाणे आवश्यक वस्तू किंवा कलश, नारळ, सुपारी, कुंकु, चंदन, अक्षत, राखी आणि मिठाई, दिवाही ठेवावा.
काय आहे प्रक्रिया - आधी घरी किंवा मंदिरात देवाला औक्षण करावे. प्रथम एक राखी श्रीकृष्णाला आणि दुसरी राखी गणेशाला अर्पण करावी. देवाला राखी अर्पण करून वर सांगितलेले शुभ मुहूर्त पाहून आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावे. यानंतर भावाला टिळा लावा, नंतर राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधावे आणि त्यानंतर त्याची आरती करावी. नंतर आपल्या भावाचे तोंड मिठाईने गोड करावे. राखी बांधताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा कापड असावे, बहिणीनेही डोके उघडे ठेऊ नये. रक्षासूत्र बांधल्यानंतर आई-वडील किंवा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा.
शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्यावी - रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राखी बांधताना शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्यावी. राखी बांधताना भाऊ किंवा बहिणीने दक्षिणेकडे तोंड करू नये, राखीच्या दिवशी भावाला टिळक लावण्यासाठी चंदन वापरावे. या काळात सिंदूर वापरू नये, असे सांगितले जाते. राखीपूर्वी भावांना औक्षण करताना अक्षताचे दाणे तुटू नयेत, असे पाहावे.