नवी दिल्ली - भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले. शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने कोणताही गैरसमज बाळगू नये. पीक काढणीसाठी शेतकरी घरी परतील आणि आंदोलन संपेल, या भ्रमात सरकारने राहू नये, वेळ आल्यास शेतकरी उभे पीक पेटवून देतील, असे राकेश टिकैत म्हणाले. हरियाणातील हिसारमध्ये आयोजित महापंचायतीत बोलत होते
पिकांचे भाव वाढलेले नाहीत. परंतु, इंधनाचे दर वाढले आहेत. गरज भासल्यास पश्चिम बंगालमध्येही जाऊ. तेथेही शेतकऱयांना एमएसपी मिळत नाही, असे राकेश टिकैत म्हणाले. घराला लागेल तेवढे पीक काढून उर्वरीत पिकाचे शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी बलिदान द्यावे, असे आवाहन टिकैत यांनी केले. यावर सभेतील शेतकऱ्यांनी हात उंचावून आपलं समर्थन दर्शवलं.
वेळ आल्यास शेतकरी आपल्या शेतातील अवजारे घेऊन दिल्लीला पोहचतील. आगामी काळात दिल्लीमध्ये 40 लाख ट्रॅक्टर पोहोचतील. शेतकरी शेतात पीक घेतील आणि सोबतच आंदोलनही करतील, असे टिकैत म्हणाले.
शेतकरी आंदोलन -
किसान संयुक्त मोर्चाने आज देशभरात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे रोको आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. 26 जानेवारीनंतर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. गेल्या 80 दिवसांपासून शेतकऱ्यांचे मोदी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी राकेश टिकैत गावा-गावत शेतकरी पंचायती घेत आहेत.