चंदीगड - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त दिल्लीच्या सीमांपुरतेच सीमित न राहता देशभरात पोहोचावे यासाठी भारतीय किसान युनियनने देशव्यापी अभियान सुरू केले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक दौऱ्यावर उद्या (शुक्रवार) येत असल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी संवाद अभियान शेतकरी संघटनांनी सुरू केले आहे.
निवडणुकांशी देणेघेणे नाही -
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यावर शेतकऱ्यांची रणनिती काय असे विचारले असता, ते म्हणाले की, आम्हाला निवडणुकीशी काहीही देणेघेणे नाही. पंजाब, हरयाणा, गुजरात, राजस्थानमधील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत.
खाप पंचायतीतही शेतकरीच -
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून खाप पंचायतींशी शेतकरी संवाद साधत आहेत. मात्र, अमित शाह यांनी खाप पंचायतींसोबत संवाद सुरू केला आहे. अनेक नेत्यांनाही या कामी लावले आहेत. यावर प्रश्न विचारला असता, टिकैत म्हणाले की, खाप पंचायतींमध्येसुद्धा शेतकरी आहेत. सरकारच्या धोरणांमुळे त्यांचेही नुकसान होत आहे.
हरयाणामध्ये येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यावर विचारले असता राकेश टिकैत म्हणाले की, निवडणुका वेळेवर व्हायला हव्यात. आपला नेता निवडीचे स्वातंत्र्य जनतेला आहे. आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. हरयाणातील हिसार येथे शेतकरी महापंचायतीला आले असता राकेश टिकैत बोलत होते.