नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आसियानच्या बैठकीस उपस्थित होते. आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. आज सकाळी 6.30 वाजता बैठक झाली. एडीएमएम प्लस हे एक महत्त्वपूर्ण मंच आहे. यात 10 आसियान सदस्य देश आणि आठ संवाद भागीदार म्हणजे ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. ही बैठक ब्रुनेई संरक्षण मंत्रालयाने आयोजित केली होती. यावर्षी ब्रुनेई आसियान गटाचे अध्यक्ष आहेत आणि सर्व बैठकींचे आयोजन ब्रनेईकडून करण्यात येत आहे.
या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यसह चीन, जपान, रशिया आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव उपस्थित होते. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा वातावरणाबद्दल भारताची मते आणि दृष्टीकोन व्यक्त करण्याची संधी मिळाल्याबद्दल एडीएमएम प्लस फोरमचे आभार राजनाथ सिंग मानले. वेगाने पसरणाऱ्या आणि रूप बदलणाऱ्या कोरोनाचे संकट सध्या आपल्यासमोर आहे, असे राजनाथ म्हणाले.
भारत-इंडो-पॅसिफिकवर भाष्य -
कालबाह्य प्रणाल्यांनी आजच्या डायनॅमिक जगातील आव्हानांचे निराकरण करता येणार नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करत चर्चेच्या माध्यमातून शांततेने तोडगा काढण्याचे आवाहन भारत करतो. तसेच भारत-इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीला चालना देण्यासाठी परिवर्तित दृष्टिकोन आणि मूल्यांचे रूपांतर करण्याच्या आधारे भारताने इंडो-पॅसिफिकमधील सहकाराचे संबंध दृढ केले आहेत, असे राजनाथ यांनी सांगितले.
सामूहिक सहकार्यानेच दहशतवादी संघटना नष्ट होतील -
दहशतवाद आणि कट्टरपंथीकरण हे जगाच्या सुरक्षा आणि शांततेला धोका आहे. ज्याचा सामना आज जग करीत आहे. सामूहिक सहकार्यानेच दहशतवादी संघटना व त्यांचे नेटवर्क पूर्णपणे नष्ट होऊ शकतील असा भारताचा विश्वास असल्याचे सिंह म्हणाले.