जोधपूर - राजस्थानच्या जोधपूरमधील बाप ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांनी भरलेल्या बसची आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लहान मुलांसह 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिनी बस ही दिल्लीवरून जैसलमैरकडे जात होती. बाप ठाण्याच्या हद्दीत ट्रेलर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. ट्रेलरमध्ये लोखंडाचे मोठे-मोठे पाईप भरलेले होते. मृतामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते. सर्व प्रवासी दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे प्रवासी जैसलमैर फिरण्यासाठी जात होते.
दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू -
देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोकांना अपघातामुळे कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.
रस्ते अपघात हे कोरोनापेक्षाही धोकादायक -
जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी 6 टक्के अपघात हे भारतात होतात. तर जगभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी 11 टक्के मृत हे भारतातील आहेत. गेल्या 32 वर्षांत देशात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत पाच पट वाढ झाली आहे. रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता 32 वर्षांपूर्वी देशात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्यास सुरूवात झाली. मात्र त्यानंतरही रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. रस्ते अपघात हे कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याची कबुली केंद्राने दिली आहे. मात्र यावर नियंत्रणासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलन : आगामी आठ महिन्यांची तयारी ठेवा, राकेश टिकैत यांचे शेतकऱ्यांना आवाहन