जयपूर - राजस्थानच्या गुप्तचर विभागाने मोठी कारवाई केली आहे. नरहेड लष्करच्या भागातील इंडेन गॅस एजन्सीचे संचालक संदीप कुमार याला राज्याच्या गुप्तचर विभागासह लष्कराच्या गुप्तचर विभागाने अटक केली आहे. चौकशीदरम्यान संदीप कुमारने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला माहिती दिल्याची कबुली दिली आहे.
संदीप कुमारवर सरकारी गोपनीय कायद्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. एडीजी इंटेलिजन्सचे उमेश मिश्रा म्हणाले, की पाकचा गुप्तहेर संदीप कुमारने जुलै 2021 मध्ये पाकिस्तानच्या हँडलिंग अधिकाऱ्याबरोबर मोबाईलने संभाषण केले होते. त्यावेळी लष्कर भागातील फोटो आणि संवदेनशील माहिती हँडलिंग अधिकाऱ्याने संदीप कुमारकडून मागविली होती.
हेही वाचा-कोरोनाच्या काळात नितीन गडकरींकडून युट्यूबचा वापर; महिन्याला कमवितात 'इतके' लाख रुपये
पैशाच्या लालसेपोटी दिली माहिती-
पैशाच्या लालसेपोटी संदीप कुमारने बँक खात्याची माहिती पाकिस्तानमधील हँडलिंग अधिकाऱ्याला व्हॉट्सअपवर पाठविली. त्यानंतर नरहड लष्कर भागाची गोपनीय माहिती संदीप कुमारने पाकिस्तानमधील हँडलिंग अधिकाऱ्याला व्हॉट्सअपने पाठविली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचा फोन जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थान गुप्तचर विभागाच्या विशेष शाखेकडून कारवाई सुरू आहे.
हेही वाचा-चारधाम यात्रेचा 18 सप्टेंबरपासून उत्तराखंडमध्ये पुन्हा श्रीगणेशा
पोलीस अधिकारी होण्याचे आरोपीचे होते स्वप्न
संशयित आरोपी संदीप हा पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तयारी करत होता. तो परीक्षा देणार होता. मात्र, त्यापूर्वीच 12 सप्टेंबर रोजी गुप्तचर विभागाने त्याला अटक केली आहे.
आरोपीचा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत
सुत्राच्या माहितीनुसार संदीपचा भाऊ राजस्थान पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. जयपूरमध्ये चालक पदावर त्याचा भाऊ कार्यरत आहे. संशयित हेर संदीपच्या खात्यात 10 हजार रुपये आयएमपीएसमधून जमा करण्यात आले होते. त्याबाबत आरोपीला माहिती देता आली नाही. आरोपीने एम. कॉमचे शिक्षण घेतले आहे.
हेही वाचा- GST COUNCIL पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याबाबत निर्णय नाही
पुणे लष्कर गुप्तचर आणि राजस्थान पोलीस यांनी केला संयुक्त तपास
पुणे लष्कर गुप्तचर आणि राजस्थान पोलीस यांनी संयुक्त तपास करत पाकिस्तानच्या हेरगिरीचा पदार्फाश केला आहे. सैन्याबाबतच्या गोपनीय पत्रांची रावळपिंडी येथे माहिती देण्यात येत होती. त्यासाठी हनी ट्रॅपचा वापर रावळपिंडी येथून सुरू असल्याचे पुराव्यासह समोर आले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती ही धक्कादायक आहे. हनी ट्रॅपने लोकांकडून आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम पाकिस्तानकडून सुरू आहे. भारतामधील नरहर या राजस्थानमधील या ठिकाणी असलेल्या गॅस प्लांट आणि संवेदनशील बाबींची माहिती काढण्यासाठी पाकिस्तानकडून हे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी साम, दाम आणि हनी ट्रॅपचादेखील वापर केल्याचे गुप्तचर विभागाला तपासात आढळले आहेत.