नागौर (राजस्थान) : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील सिंधलस गावातून बुधवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. येथे एका अल्पवयीन मुलाने आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याची मोठी काकू आणि त्यांच्या मुलीवर गोळीबार केला. या घटनेत काकू सीता देवी यांना चार गोळ्या, तर बहीण सुषमा यांना एक गोळी लागली. दोघींना आधी कुचेरा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना आता जोधपूरला नेण्यात आले आहे.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले : या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन कुटुंबातील परस्पर वादामुळे सीता देवी आणि त्यांचे कुटुंब जोधपूरला स्थलांतरित झाले होते. मात्र गावात शेती असल्यामुळे त्यांची तेथे ये-जा असायची. बुधवारी त्या गावात आल्या असता, या अल्पवयीन मुलाने त्यांना पाहिले. या दरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्या आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सीता देवी आणि त्यांच्या लहान मुलीवर गोळीबार केला. मात्र लक्ष्य चुकल्याने गोळी त्यांच्या पायाला लागली. गोळीबारानंतर मुलगा शेतात जाऊन लपला. त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले आहे.
आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी गोळीबार केला : शेतात गुरे ठेवण्यावरून 2016 मध्ये या दोन कुटुंबात वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाची आई पूनम हिचा खून झाला होता. सीता देवी यांच्या मोठ्या मुलीने हा खून केल्याचा आरोप आहे. याचा बदला घेण्यासाठी आज या अल्पवयीन मुलाने सीता देवी आणि त्यांच्या लहान मुलीवर गोळीबार केला. दोघींच्याही पायाला गोळ्या लागल्या आहेत. आधी त्यांना तात्काळ कुचेरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना प्रथम नागौर आणि नंतर जोधपूरला पाठवण्यात आले आहे.
जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी : काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील काली पहारी गावात जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. काही वेळातच दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या लोकांना गोळ्या घातल्या. तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण आहे. घटनेनंतर आरोपी पक्ष गावातून फरार झाला. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.
हेही वाचा :