नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन आभावी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता केद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती.
रेल्वेद्वारे एलएमओ टँकर वाहतूक करण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता. द्रवरूपातील ऑक्सिजन (एलएमओ-लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) आणि ऑक्सिजन सिलिंडर रेल्वेद्वारे आणण्यात येणार आहे. मालगाडीच्या रिक्त कोचमध्ये ऑक्सिजन टँकर पाठविले जातील. रविवारी मुंबईच्या बोईसरमध्ये ट्रायल करण्यात आले. येत्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात येईल.
कोरोना रुग्णांची आकेडवारी -
गेल्या 24 तासांत भारतात 2,61,500 ताज्या रूग्णांची नोंद झाली. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,47,88,109 वर पोहचली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1501 जण मरण पावले आणि आतापर्यंत देशातील मृत्यूची संख्या 1,77,150 वर पोहचली आहे. तर देशात सध्या 18,01316 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करा; कपिल सिब्बल यांची मागणी