नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलवरील करातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करापासून मिळणार्या उत्पन्नाशी संबंधित एक वृत्त शेअर केले असून मोदी सरकारने कर संकलनात पीएचडी केली आहे, असे टि्वट केले. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या वृत्तामध्ये दावा करण्यात आला आहे, की मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून आयकर आणि कॉर्पोरेट करापेक्षा जास्त कमाई केली आहे. गेल्या सात वर्षांत इंधनावरील कराच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाल्याचेही वृत्तामध्ये म्हटलं.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक वृत्त शेअर केले आहे. त्यानुसार भारत सरकारला आयकरातून 4.69 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तर खासगी कंपन्यांनी ने 4.57 लाख कोटी कॉर्पोरेट कर जमा केला आहे. दुसरीकडे या दोन्ही करापेक्षा जास्त 5.25 लाख कोटी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी आणि वॅटच्या रूपात जनतेने भरला आहे. ही आकडेवारी फक्त डिसेंबर 2020 पर्यंतची आहे. यात जानेवरी ते मार्च ही तीमाही सामील नाही.
राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्याचा आरोप यापूर्वी केंद्रावर केला होता. संकटाच्या वेळी लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार जनतेचे खिसे कापत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात विकासाची स्थिती अशी आहे की, इंधन दर वाढले नाहीत. तर मोठी बातमी ठरते, असे ते म्हणाले होते. तसेच आणखी एका टि्वटमध्ये राहुल गांधी म्हणाले होते, की पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे करण्यात आलेला 'महागाईचा विकास' दिसेल.
इंधन तेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर...
पेट्रोल आणि डिझेलदेखील जीएसटीखाली आणण्याची मागणी संसदेमध्ये होत आहे. इंधन तेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना मोठा दिलासा मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे. लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन केंद्राने इंधनाचे दर त्वरित नियमित करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. राज्यांनाही त्या दिशेने प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरून देशातील हताश जनतेला थोडासा दिलासा मिळू शकेल.