नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण विभागासोबत धोका झाला आहे. देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल यासाठी अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा भांडवलदारांच्या फायद्याचा आहे. सध्या आपले सैनिक सीमेवर चीनच्या आक्रमक कारवायांना तोंड देत आहेत. अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी सुद्धा काही दिले गेले नाही, असे राहुल म्हणाले.
भारतातील मालमत्ता मोदींच्या भांडवलशाही मित्रांना -
यापूर्वी, नरेंद्र मोदी हे भारतातील मालमत्ता आपल्या भांडवलशाही मित्रांना देण्याची योजना आखत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसेच, अर्थसंकल्पातून सामान्यांच्या हातात काहीच रक्कम मिळत नसल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली होती. सरकारने देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी लघु व मध्यम उद्योग, शेतकरी आणि कामगारांना पाठिंबा द्यायला हवा, असेही गांधी यापूर्वी म्हणाले होते.