न्यूयॉर्क : राहुल गांधींनी ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ 60 सेकंद मौन पाळले. त्यानंतर पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली. ओडिशामध्ये तिहेरी रेल्वेचा अपघात झाला. यात 280 जण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर रेल्वेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. हीच धार पकडून राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली.
राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेसची सत्ता असताना एक रेल्वे अपघात झाल्याचे मला आठवते , पण काँग्रेस उठून असे कधी म्हटले नाही की, हा अपघात इंग्रजांच्या चुकीमुळे झाला. त्याऐवजी काँग्रेस नेत्याने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीमान दिला. असे सांगत राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्याचे कौतुक केले. अपघात झाला तेव्हा काँग्रेस मंत्री तेव्हा म्हणाले, 'ही माझी जबाबदारी आहे आणि मी राजीनामा देत आहे'. ही समस्या आहे, म्हणून आम्ही परत जात आहोत. आम्ही सबब काढत नाहीत. जे वास्तव आहे त्याला स्वीकारतो, असे राहुल गांधी यांनी काँग्रेस मंत्र्याचे नाव न घेता सांगितले.
पंतप्रधान मोदी मागाचा आरसा पाहून कार चालवतात : भाजपवर टीका करताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भविष्याकडे पाहण्यास असमर्थ आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय कार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मागील-दृश्य (रिअर व्ह्यू मिरर) आरशात पाहत आहेत. त्यामुळेच त्यांना समजत नाही की गाडी पुढे न जाता क्रॅश का होत आहे. भाजपची, आरएसएसची तीच कल्पना आहे. सर्वांचीच समज तशीच आहे. तुम्ही मंत्र्यांचे ऐका, तुम्ही पंतप्रधानांचे ऐका. तुम्हाला ते भविष्याबद्दल कधीच बोलताना दिसणार नाहीत. ते फक्त भूतकाळाबद्दल बोलतात,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
भारतात दोन विचारसरणीत संघर्ष : पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भविष्याकडे पाहण्यास असमर्थ आहेत. ते भविष्याबद्दल कधीच बोलत नाहीत, ते फक्त भूतकाळाबद्दल बोलतात. तसेच ते भूतकाळासाठी नेहमी कोणालातरी दोष देत असतात.
भारतात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक काँग्रेस आणि दुसरी भाजप आणि आरएसएस. या लढ्याचे वर्णन करणे सोपे आहे, एका बाजूला तुमच्याकडे महात्मा गांधी आहेत आणि दुसऱ्या बाजूला नथुराम गोडसे आहेत . - राहुल गांधी काँग्रेस नेते.
भारतीय-अमेरिकन समुदायाचे कौतुक : याचबरोबर त्यांनी अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन समुदायाचे जीवन जगण्याचे कौतुकही केले. भारतातून जे दिग्गज येथे आले आहेत, त्या सर्वांमध्ये काही विशिष्ट गुण होते. सर्वात आधी त्यांनी सत्याचा शोध घेतला. प्रतिनिधित्व केले आणि लढा दिला. दुसरे म्हणजे हे सर्व लोक नम्र होते आणि त्यांच्यामध्ये अहंकार नव्हता. अमेरिकेत भारतीयांनी असेच काम केले आहे आणि त्यामुळेच भारतीय लोक येथे यशस्वी झाले आहेत, त्यामुळे मी तुमचा आदर करत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा -