नवी दिल्ली - काँग्रेस नेता राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ, अर्थव्यवस्था, कृषी आंदोलन आशा मुद्यावरून केंद्राला लक्ष्य करत आहेत. आता पुन्हा राहुल गांधींनी बेरोजगारीवरून केंद्रावर निशाणा साधला. हिम्मत असेल तर नोकरी आणि शेतकऱ्यांवर बोला, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. #KisanKiBaat #JobKiBaat हा हॅशटॅग त्यांनी टि्वट केला.
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर #ModiRojgarDo हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. युजर्संनी रोजगारासंदर्भात अनेक मीम्स टि्वट केले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे उद्योगपतींशी असलेल्या संबंधावरून 'हम दो हमारे दो' हॅशटॅग टि्वट करत टीका केली होती.
राहुल गांधींची आरएसएसवर टीका -
गेल्या सहा वर्षात संस्था आणि देशाला एकत्र ठेवणाऱ्या स्वतंत्र पत्रकारीतेवर पद्धतशीर हल्ला झाला आहे. लोकशाही एका झटक्यात मरत नाही, हळूहळू मरते. आरएसएसने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) संस्थात्मक संतुलन नष्ट केले आहे, असे ते म्हणाले होते.
मोटेरा स्टेडीयमवरून मोदींवर टीका -
यापूर्वीही राहुल गांधी यांनी गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम ठेवल्यावरून मोदींवर टीका केली होती. सत्य कसे सुंदरतेने बाहेर येते. नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड आहेत. याचे अध्यक्ष जय शाह आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले होते. तसेच मोदी सरकार हे अदानी आणि अंबानी यांना झुकतं माप देतातं, असाही आरोपी त्यांनी केला होता.