लंडन : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या संस्था सामान्यतः स्वतंत्र राहायला हव्यात त्या केंद्र सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. मोदी सरकारवर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, सरकारने पेगाससच्या माध्यमातून त्यांच्या फोनवर हेरगिरी केली आहे.
'पेगाससद्वारा हेरगिरी केली' : केंब्रिज विद्यापीठातील बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. ते म्हणाले की, माध्यमे आणि न्यायव्यवस्थाही केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. राहुल गांधी म्हणाले की, सरकारने पेगाससद्वारा माझ्या मोबाईलवर हेरगिरी केली आहे. ही माहिती त्यांना गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. राहुल म्हणाले की, केंद्र सरकारच्या सांगण्यावरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य : विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी लोकशाही मूल्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, लोकशाही मूल्यांशिवाय जग उभारताना आपण पाहू शकत नाही. 'लर्निंग टू लिसेन इन इन 21 सेंचुरी' या विषयावर बोलताना ते म्हणाले की, आपल्याला लोकशाही मूल्ये जपायची आहेत. ते म्हणाले की, आपल्याला असे जग निर्माण करायचे आहे जिथे कोणावरही काहीही लादले जाणार नाही. यावेळी त्यांनी जगातील अर्थव्यवस्थांच्या घसरणीवर चिंता व्यक्त केली. विशेषतः अमेरिका आणि भारतातील उत्पादन क्षेत्रातील घसरणीचा त्यांनी उल्लेख केला. या बदलामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता आणि नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेचाही उल्लेख : राहुल गांधींनी आपल्या भाषणात भारत जोडो यात्रेचाही उल्लेख केला. काश्मीरचा उल्लेख करून ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्हाला हिंसाचारग्रस्त काश्मीरमध्ये प्रवास करण्याबाबत चेतावणी दिली जात होती. मात्र ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचल्यावर हजारो लोक तिरंगा घेऊन चालत आले. एका घटनेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, यात्रेदरम्यान एके दिवशी एका व्यक्तीने काही मुलांकडे बोट दाखवून ते अतिरेकी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की मी त्या मुलांकडे पाहिले, ते माझ्याकडे टक लावून पाहत होते. पण त्यांनी काहीच केले नाही. ते म्हणाले की संवाद आणि अहिंसेमध्ये खूप शक्ती आहे, जी समजून घेणे आवश्यक आहे.
राहुल गांधींचा युरोप दौरा : काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या लंडन दौऱ्याची माहिती दिली आहे. केंब्रिज विद्यापीठातील संबोधनानंतर राहुल गांधी युरोपियन युनियनच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. ते तेथे अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा करतील. ब्रिटनहून राहुल गांधी नेदरलँडला जाणार आहेत. तेथे ते अनिवासी भारतीयांच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : Rahul Gandhi New Look : राहुल गांधी दिसले नव्या लुकमध्ये! सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा!