हैदराबाद - तेलंगाणा येथील राचकोंडा पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्र तस्कर टोळीचा पर्दाफाश करत दोन कुख्यात तस्करांना अटक केली आहे. अटक केलेले दोन जण पुणे येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नंदकिशोर ( वय २३ वर्षे, गणेश नगर, पिंपरी चिंचवड) आणि रोहन चंदेलिया (२२ वर्ष, डी मार्ट जवळ, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन बंदुका व चार जिंवत कारतुसे जप्त केली आहेत. या दोघांचा साथीदार किरण खवळे फरार आहे.
दोघांकडून मोबाईल फोन व पाचशे रुपयांची रोकड जप्त केली आहे.
नंदकिशोर व रोहन हे दोघे मित्र असून दोघांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनिकेत जाधव याने सुरू केलेल्या रावण साम्राज्य या टोळीसाठी दोघेजण काम करत होते. नंदकिशोर दहावीपर्यंत शिकलेला आहे तर रोहनने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. २०१६ पासून दोघे गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहेत.