हैदराबाद - नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात रचाकोंडा विभागाचे मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी मार्गदर्शन केलेले तब्बल 131 उमेदवार चांगल्या रँकने उत्तीर्ण झाले आहेत. आयपीएस महेश भागवत हे मागील अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असतात. महाराष्ट्रतील देखील अनेक विद्यार्थ्यांना महेश भागवत मार्गदर्शन करत असतात.
हेही वाचा - दख्खनेतील महाराष्ट्र..! आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या कार्याची तेलंगाणामध्ये छाप
- महेश भागवत यांनी मार्गदर्शन केलेले 131 उमेदवार उत्तीर्ण -
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२०मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७६१ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये बिहारचा आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आला आहे. नियुक्त झालेल्या 761 उमेदवारांपैकी 131 उमेदवारांना मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले होते. यातील 19 उमैदवार हे 100 रँकच्या आत उत्तीर्ण झाले आहेत.
- कर्तव्य पार पाडत महेश भागवत करतायेत विद्यार्थ्याना मार्गदर्शन -
महेश भागवत यांनी मार्गदर्शन केलेल्या उमेदवारांमध्ये दिल्ली येथील दोन बहिणी अंकिता जैन आणि वैशाली जैन या दोघींनी अनुक्रमे 3 आणि 21 रँक मिळवत यश प्राप्त केले आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील दोन भावांनीही चांगली कामगिरी करत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. दरम्यान, तेलंगाणा राज्यातून पहिली आलेली पी. श्रीजा हिलादेखील महेश भागवत यांनी मार्गदर्शन केले होता. श्रीजाला या परीक्षेत 20 वी रँक मिळाली आहे.
कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जाऊन महेश भागवत हे प्रत्येक वर्षी विनामूल्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा, मुलाखतीसाठी मार्गदर्शन करत असतात. भागवत यांच्या या प्रयत्नांमुळे मागील सात वर्षांत स्पर्धा परीक्षा करणाऱया जवळपास 1 हजार उमेदवारांना मदत झाली आहे.
- ऑनलाइन पद्धतीने केले जाते मार्गदर्शन -
दरम्यान, हे सर्व मार्गदर्शन व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे. या ग्रुपमध्ये महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, बिहार, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, ओडिशा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल या राज्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे महेश भागवत यांनी सांगितले. कोरोनाकाळात या विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टया आधार देणे गरजेचे होते. त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची एक टीम तयार केली होती आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते. असेही महेश भागवत यांनी सांगितले आहे.
यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करत भागवत यांनी त्यांना प्रशासनात नागरिकांना अनुकूल अशा सेवा देण्याचा सल्ला दिला. तसेच प्रामाणिकपणे वचनबद्धतेचे काम करणाचा सल्लाही महेश भागवत यांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दिला आहे.
- या अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन -
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी महेश भागवत यांनी Whats App ग्रुप तयार केला होता. यात डॉ. शैलेंद्र देओळणकर (आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ), आयआरएस नितीश पाथोडे, आयएएस निळकंठ आव्हाड, आयएएस आनंद पाटील, आयआरएस मुकुल कुलकर्णी, JPC संचालक डॉ. विवेक कुलकर्णी, आयएएस डॉ. श्रीकर परदेशी, निवृत्त आयआरएस राजीव रानडे, समीर उन्हाळे (Jt आयुक्त MUAD), सुप्रिया देवस्थळी (ICAS), अभिषेक सराफ (IAS), साधू नरसिंह रेड्डी (IRS - A.P) आणि अनुदीप दुरीशेट्टी (जिल्हाधिकारी - भद्रद्री-कोठागुडेम) या अधिकाऱयांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे शक्य झाल्याचे उत्तीर्ण उमेदवारांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
- महेश भागवत यांचे मार्गदर्शन मोलाचे - विनायक नरवडे
अहमदनगरमधील विनायक नरवडे हा महाराष्ट्रमध्ये दुसऱ्या क्रमांकाने तर देशात 37 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल विनायक नरवडे याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. माझ्या यशात महेश भागवत यांचे मोलाचे योगदान आहे. ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमातून महेश सरांनी परीक्षांसंदर्भातले अनेक प्रश्न सोडवले. या ग्रुपमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे त्याचा आम्हाला फायदा झाला. मुलाखतीच्या तयारीसाठी महेश सरांनी महत्वाचे मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच हे यश मिळवणे सोप्प झाल्याचे विनायक नरवडे याने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
- महेश भागवत यांचा अल्पपरिचय -
महेश भागवत हे १९९५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. मुळ पाथर्डी येथील असलेल्या महेश भागवत यांचे आईवडील शिक्षक होते. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरींग केले. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील अनेक अधिकार्यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत.
हेही वाचा - दक्षिणेतील 'द रियल सिंघम' मानव तस्करांचा कर्दनकाळ, या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा अमेरिकेत डंका'