नवी दिल्ली - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्रातून गंभीर आरोप केले. मात्र, त्याची पडताळणी केली असता, त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यांनी पत्रात उल्लेख केलेल्या तारखेप्रमाणे पाहिले असता, त्यावेळी अनिल देशमुख नागपुरात होते. त्यामुळे या तथ्यहिन आरोपांमुळे देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
परमबीर सिंग यांनी पत्रातून आरोप करताना सचिन वाझे फेंब्रुवारीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांना भेटले होते, असा उल्लेख केला आहे. मात्र, त्यात दिलेल्या तारखांची पडताळणी केली असता, त्या तारखेवेळी अनिल देशमुख नागपुरात होते. त्यामुळे या आरोपात तथ्य नसल्याचे पवार म्हणाले.
तपासाची दिशाभूल करण्यासाठी पत्रातून आरोप-
गृहमंत्र्यांवर हे आरोप जाणीवपूर्वक केले जात आहेत. मुख्य विषय हा अँटिलिया समोर जिलेटिन्सच्या काड्यांची स्कॉर्पिओ कोणी ठेवली हा आहे. तसेच, या प्रकरणात हिरेनेची हत्या कोणी केली हे आता स्पष्ट झाले आहे. एटीएसने त्याचा छडा लावला आहे. मुंबई एटीएस बरोबर तपास करत आहे. ते योग्य दिशेने जात आहेत. मात्र काही जण लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच अशाप्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले असल्याचेही पवार म्हणाले.
विरोधकांची मागणी अयोग्य-
परमबीर सिंग यांच्या आरोपाच्या घटनेचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. मंत्र्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्यानुसार त्या काळात ते कुठे होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा वेळी त्यांचा राजीनामा घेणे योग्य नाही. विरोधकांची मागणी अयोग्य आहे. मागणीतला दम निघून गेला आहे, असा टोला लगावत पवारांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांबरोबरही चर्चा झाली आहे. त्यांच्या समोर आम्ही सत्य ठेवले आहे. आरोपातच सत्यता नाही. हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आता परमबीर यांच्या पत्राच्या चौकशीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. अजून चौकशी झालेली नाही. मात्र आता एक गोष्ट स्पष्ट झाले आहे की गृहमंत्र्यांवर ज्या कालावधीतील आरोप केले आहेत. ते चुकीचे आहेत. जी वेळ सांगितली त्यावेळी ते नागपुरात होते, असे ही पवार यांनी स्पष्ट केले.
-