अहमदाबाद (गुजरात) - शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पुष्य नक्षत्र आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सोने-चांदीच्या खरेदीत वाढ झाले आहे. कोरोनामुळे आर्थिक स्थिती मंदावली आहे. तरीही शनिवारी गुजरातमध्ये ३०० ते ३५० किलो सोने-चांदीची विक्री झाली आहे.
पुष्य नक्षत्राआधी सोने-चांदीच्या दरात वाढ -
सध्या सोने आणि चांदीचे भाव खूप वधारले आहेत. पुष्य नक्षत्राच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी अहमदाबादच्या सराफा बाजारात चांदीच्या भावात एक किलोमागे साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली होती. तर, प्रति तोळे सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी वाढ झाली. शनिवारी सराफा दुकानांमध्ये एक किलो चांदीचे दर ६३ हजार ५०० ते ६४ हजार रुपये होते. तर सोन्याचे भाव ५३ हजार ५०० ते ५४ हजार रुपयांच्या दरम्यान होते.
दिवाळीनंतर लग्न-समारंभात वाढ -
कोरोनामुळे लग्न-समारंभासह अनेक शुभप्रसंग होऊ शकलेले नाही. केंद्र सरकारने आता अनलॉकच्या गाइडलाइन्समध्ये प्रत्येक सोहळ्यात २०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर लग्न-समारंभासह इतर शुभकार्य वाढतील. त्यामुळे दिवाळीत सोने-चांदी खरेदीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्के कमी विक्री -
ज्वेलर्स असोसिएशन अहमदाबादचे प्रमुख जिगर सोनी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की यावर्षी फक्त ३०० ते ३५० किलो सोने-चांदीची विक्री झाली आहे. त्यासाठी १० दिवसआधीपासून बुकींगला सुरुवात झाली होती. कोरोनाचा फटका बसला असला तरी, दागिन्यांची विक्री बऱ्यापैकी झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्क्यांनी विक्री कमी झाली आहे.
कोरोनामुळे अॅडव्हान्स बुकींग -
एबी ज्वेलर्सचे मालक मनोजभाई सोनी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करण्यासाठी लोकांनी यावर्षी ऑनलाइन बुकींगला प्राधान्य दिले. तसेच यावर्षी सोने-चांदीचे दर वाढलेलेच असतील हे स्विकारून लोकांनी खरेदीला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.