भुवनेश्वर : आज सकाळी पुरीहून सूरतला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसची काही चाकं रुळावरुन खाली घसरली. एका हत्तीला ही रेल्वे धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये सर्व प्रवासी सुखरुप असले, तरी हत्तीचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पहाटे दोनला झाला अपघात..
पूर्व किनारी रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ७.२४ला ही रेल्वे हातीबारी या स्थानकाहून निघाली होती. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास रेल्वे रुळांवर अचानकपणे एक हत्ती आल्याने, रेल्वेची या हत्तीला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती, की इंजिन ट्रॉलीची सर्व चाकं रुळावरुन खाली घसरली. संभळपूरच्या जवळपास हा अपघात झाला.
वनविभागाने केली चौकशी..
यानंतर संभळपूरचे विभागीय रेल्वे मॅनेजर प्रदीप कुमार हे अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात सर्व प्रवासी सुखरुप आहेत. तसेच, इंजिन चालक आणि सहचालकही सुखरुप असल्याचे कुमार यांनी सांगितले. यासोबतच वनविभागाचे अधिकारीही याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी अपघाताबाबत चौकशी केली.
रेल्वे पुन्हा हातीबारी स्थानकावर..
यानंतर या गाडीचे सर्व डबे हातीबारी रेल्वे स्थानकावर परत आणण्यात आले आहे. अपघातग्रस्त इंजिनची दुरुस्ती झाल्यानंतर ही रेल्वे पुन्हा सूरतला रवाना होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : 'बंगालमध्ये राजकीय हिंसाचार शिगेला, भाजपाच्या 300 कार्यकर्त्यांची हत्या'