नवी दिल्ली Safest City In India : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 'क्राइम इन इंडिया २०२२' अहवालानुसार, राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुण्यानं सुरक्षिततेच्या बाबतीत देशात दुसरं स्थान पटकावलं आहे.
कोलकाता सलग तिसऱ्या वर्षी अव्वल : या क्रमवारीत, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातानं सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं असून, ते देशातील सर्वात सुरक्षित शहर बनलं आहे. येथे प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये कोलकातामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे ८६.७ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. तर पुण्यात २८०.७ आणि हैदराबादमध्ये २९९.२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दखलपात्र गुन्हा म्हणजे ज्यावर भारतीय दंड संहिता आणि विशेष आणि स्थानिक नियमांनुसार गुन्हा नोंदवला जातो.
१९ शहरांची तुलना केली : २० लाख लोकसंख्या असलेल्या १९ शहरांची तुलना केल्यानंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. २६ राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय एजन्सींकडून डेटा गोळा करून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये कोलकातामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे १०३.४ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर पुण्यात २५६.८ आणि हैदराबादमध्ये २५९.९ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती.
कोलकात्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ : अहवालानुसार, कोलकात्यात एकूण गुन्हेगारी कमी झाली असली तरी, महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरात २०२१ मध्ये महिलांविरुद्ध गुन्ह्यांची १,७८३ प्रकरणं नोंदली होती. २०२२ मध्ये ती वाढून १,८९० झाली.
हेही वाचा :