कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने आपली सारी शक्ती पणाला लावली आहे. ममता यांच्या पक्षातील अनेक बडे नेते भाजपाच्या गळाला लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात नंदीग्राम मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये ही लढाई प्रतिष्ठेची बनली असून संपूर्ण देशाचे नंदीग्राम मतदासंघाकडे लक्ष लागले आहे. यामुळे नंदीग्राम मतदानाच्या दिवशी हिंसक घटना घडू नये, म्हणून केंद्रीय सुरक्षा दलाच्या 22 कंपन्या मतदारसंघात तैनात करण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामध्ये 1 एप्रिलला म्हणेजच उद्या मतदान होणार आहे. मतदारसंघात एकूण 355 मतदान केंद्र आहे. सध्या मतदारसंघातील वातावरण चांगलेच गरम आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय सुरक्षा दलाच्या 22 कंपन्या नंदीग्राममध्ये तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. उद्याचा दिवस हाय होल्टेज घडोमोडींचा ठरणार आहे. नंदिग्राममधील लढत सर्वांत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू अशी सुवेंदू अधिकारी यांची ओळख होती. मात्र, त्यांनी ममता दीदींना रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे सुवेंदू यांच्या विरोधात थेट ममता मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांचे राजकीय भविष्य धोक्यात आहे. मात्र, सुवेंदू यांनी दीदींना पराभूत करू असा विश्वास व्यक्त केलाय.
ममतांचे कडवे आव्हान -
नंदीग्राम हा सुवेंदू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या एका दशकापासून नंदीग्राम मतदारसंघ टीएमसीकडे आहे. मात्र, सुवेंदू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हा गडही भाजपकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सुवेंदू यांची अग्नी परिक्षा -
नंदीग्राममध्ये सुवेंदू यांची पकड आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी माकपचे अब्दुल कबीर शेख यांना 81,230 मतांनी पराभूत केले होते. परंतु सुवेंदू यांनी आतापर्यंत नंदीग्राममध्ये तृणमूलच्या बॅनरखाली सत्ता केली. आता जेव्हा ते तृणमूलच्या विरोधात लढत आहेत. तर त्यांच्यासाठी विजय मिळवणे फार कठीण आहे. आता भाजपाच्यावतीने ते ममता बॅनर्जी यांना किती यशस्वीरित्या तोंड देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - इशरत जहां बनावट चकमक प्रकरण; सीबीआयने घेतले तीन दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे आरोप मागे