नवी दिल्ली - आसाममधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सभा घेणार आहेत. त्यांच्या ६ सभा प्रस्तावित असल्याचे समजते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नुकतेच येथील जनतेला संबोधित केले होते.
21 आणि 22 मार्चदरम्यान दौरा
काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशची प्रभारी प्रियंका गांधी 21 आणि 22 मार्चदरम्यान आसामच्या दौर्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्या सहा जाहीर सभांना संबोधित करतील. बोर्डुवा सत्रा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानालाही त्या भेट देणार आहेत.
हेही वाचा - विधानसभेची रणधुमाळी सुरू, प्रियंका गांधी आसाम दौऱ्यावर
शंकरदेव यांच्या जन्मस्थळाला भेट
21 मार्च रोजी त्या जोरहाट, नाझिरा आणि खुमताई येथे तीन जाहीर सभांना संबोधित करतील. सोमवारी शारूपथार, कालियाबोर आणि नागाव येथे सभांना संबोधित करणार आहेत. तर सोमवारी शंकरदेव यांच्या जन्मस्थळी त्या भेट देतील.
'सीएए रद्द करणार'
प्रियंका गांधी १ आणि २ मार्च रोजी राज्याच्या दौर्यावर आल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांनी चहा बाग कामगारांशी चर्चा केली होती. पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांनाही संबोधित केले होते. आपला पक्ष सत्तेत आल्यास सीएए (नागरिकता दुरुस्ती कायदा) कायदा रद्द करण्याचे वक्तव्य त्यांनी सभेदरम्यान केले होते.
हेही वाचा - वसंत पंचमीनिमित्त प्रियंका गांधींनी दिला आजीच्या आठवणींना उजाळा
'पंतप्रधानांकडून अपेक्षा नाही'
2 मार्च रोजी उत्तर आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील तेजपूर येथे झालेल्या सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या होत्या, की येथील लाखो नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. मात्र पंतप्रधानांनी राज्याचा दौरा केला नाही, कोणतीही आर्थिक मदतही केली नाही. त्या पुढे म्हणाल्या, की केवळ पुराच्या काळातच नाही, तर आसाममधील नागरिक सीएएविरोधात आंदोलन करत होते, त्यावेळीही पंतप्रधान शांत होते. त्यांनी स्वतःला दिल्लीत ठेवले होते. आपणास संकटाच्या वेळी पंतप्रधानांची अपेक्षा असू शकत नाही, कारण ते त्यांच्या निवासस्थानावरून बोलण्यासाठी बाहेर आले नव्हते.