नवी दिल्ली - 'सायकल गर्ल' नावाने प्रसिद्ध असेल्या ज्योतीचे वडिल मोहन पासवान यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने 31 मे म्हणजेच गेल्या सोमवारी निधन झाले आहे. आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी ज्योतीशी संवाद साधला. ज्योतीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च काँग्रेस उचलणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. तसेच तीच्या कुटुंबाला शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ज्योतीच्या कुटुंबाप्रती काँग्रेसकडून संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
प्रियंका गांधींनी ज्योतीशी संवाद साधल्यानंतर काँग्रेस नेता मशकूर अहमद उस्मानी यांनी प्रियंका गांधींचे हस्ताक्षर असलेले शोक संवेदना पत्र ज्योतीला सोपवले. प्रियंका यांनी ज्योतीला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
कोण आहे ज्योती पासवान ?
ज्योती पासवान ही मुळची दरभंगा जिल्ह्यातील सिरहुल्ली गावची रहिवासी आहे. ती आपल्या कुटुंबासोबत गुडगावमध्ये राहात होती. तिचे वडील मोहन पासवान हे रीक्षाचालक होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवाहार ठप्प झाले, अनेकांवर बोरोजगारीचे संकट कोसळले, यातीलच एक ज्योतीचे कुटुंब देखील होते. लॉकडाऊनमुळे आधिच अडचणीत सापडेल्या ज्योतीच्या वडिलांचा याचदरम्यान अपघात झाला. वडिलांचा अपघात आणि लॉकडाऊन यामुळे ज्योतीने अखेर आपल्या मुळ गावी सिरहुल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
तिने त्यासाठी एक जुनी सायकल खरेदी केली. या सायकलवर आपल्या वडिलांना घेऊन ती गुडगाववरून दरभंगाला निघाली. तीने अवघ्या सहा दिवसांत 1200 किलोमिटरचे अंतर पार केले. ही बातमी प्रसार माध्यमातून प्रचंड व्हायरल झाली. बातमी व्हायरल होताच तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी देखील ट्विट करत ज्योतीचे कौतुक केले होते. ज्योती पासवानला यंदाच्या बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तीच्या धाडसासाठी तिला हा शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.