नवी दिल्ली - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उत्तर प्रदेशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर आणि राज्यातील परिस्थितीविषयी चर्चा केली. यावेळी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशात अमानुषपणा शिगेला पोहचला आहे. रुग्णालयाची क्षमता वाढवण्याऐवजी स्मशानभूमीची क्षमता राज्य सरकार वाढवित आहे, असे त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेश सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे. सरकार निष्काळजीपणाने वागत आहे. खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी घेण्यास परवानगी नाही. इस्पितळात दाखल होण्यासाठी तुम्हाला सीएमओकडून पत्र घेण्याची गरज आहे. एक कोरोनाकडून तर दुसरा मुख्यमंत्र्यांकडून असा दुहेरी हल्ला लोकांवर होत आहे. नियम आणि कायदे लोकांना मदत करण्यापेक्षा लोकांच्या अडचणी वाढवत आहेत, असे प्रियांका म्हणाल्या. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पूर्ण कटिबद्द आहे, असेही त्या म्हणाल्या.
या नेत्यांची बैठकीत हजेरी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, माजी मंत्री प्रदीप जैन, माजी राज्यसभा सदस्य प्रमोद तिवारी, सदस्य विधान परिषद दीपक सिंग, सैफ अली नकवी, हरेंद्र मलिक, संजय कपूर, देवेंद्र प्रताप सिंह, माजी खासदार राशिद अल्वी, वीरेंद्र चौधरी, विवेक बन्सल, गायदीन, अनुरागी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत सामिल होते.
मध्य प्रदेशातील कोरोना परिस्थिती -
मध्य प्रदेशमध्ये आज 4 हजार 888 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 43 हजार 539 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3 लाख 5 हजार 832 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 4 हजार 261 जणांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या 13 लाख 65 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 72 हजार 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 23 लाख 36 हजार 36 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा - देशातील विद्यापीठांच्या शिखर संघटनेची बैठक; पंतप्रधान मोदींनी केले संबोधित