नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. देशाच्या राजकारणाला रणनीतीशी जोडणारे प्रचार तज्ञ प्रशांत किशोर यांनी टि्वट करत राज्यात तृणमूल काँग्रेसच सत्तेत येणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतातील लोकशाहीची मुख्य लढाई ही पश्चिम बंगालमध्ये लढली जात आहे. पश्चिम बंगालमधील जनता आपला कौल देण्यासाठी तयार आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विजयात प्रचार तज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता ते तृणमूल काँग्रेसच्या रणनीतिकारांची भूमिका पार पाडत आहेत. बंगालला फक्त आपली मुलगी हवी आहे, असे ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांची कामगिरी -
आंध्रप्रेदशमधील निवडणुकीत जगनमोहन रेड्डींसाठी प्रशांत किशोर यांनी काम केले होते. यामध्ये वायएसआर काँग्रेसने विधानसभेतील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला होता. तर, लोकसभेतही २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. प्रशांत किशोर यांनी २०१४ साली नरेंद्र मोदींसाठी काम केले होते. त्यांना पडद्यामागील घडामोडींसाठी ओळखले जाते. त्यांनी नितीश आणि लालूंसाठीही काम करताना त्यांना निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले होते.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -
पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.