कांकेर (छत्तीसगड): छत्तीसगड येथील कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले की, जिल्हा पोलिस आणि बीएसएफची संयुक्त पार्टी गस्तीवर निघाली होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात नक्षलवादी पळून गेले. 4 ते 5 नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. सकाळी 7.30 वाजता आणि नंतर सकाळी 10 वाजता दोन वेळा नक्षलवाद्यांची पोलीस कर्मचार्यांशी चकमक झाली आहे. परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. अतिरिक्त फौजफाटाही पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
7 फेब्रुवारीला दोन नक्षलवाद्यांना अटक : कांकेर पोलीस आणि बीएसएफ जवानांनी जिल्ह्यातील अंबेडा पोलीस ठाण्यांतर्गत दरो खल्लारी आणि तामोरा या जंगलातून दोन नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून वॉकी टॉकी, रोख रक्कम, कुऱ्हाड आणि इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. बीएसएफ आणि डीआरजी पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान पोलीस जवानांना हे यश मिळाले आहे. अलीकडच्या काही काळामध्ये छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवादी अनेकदा आमने सामने आल्याचे दिसून येत आहे.
कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांकडून नक्षलवादी टार्गेट: कांकेरमध्ये सुरक्षा दलांच्या सततच्या कारवाईनंतर नक्षलवादी बॅकफूटवर आहेत. नक्षल कारवायांशी संबंधित आकडे बघितले तर २०२१ मध्ये ४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 2 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी 27 बॉम्ब जप्त करून निकामी करण्यात आले आहेत. 2022 सालाबद्दल बोलायचे झाले तर, येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याच 3 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. ५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 2 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 9 बॉम्ब जप्त करून निकामी करण्यात आले आहे.
बनावट चकमक केल्याचाही आरोप: यापूर्वी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ४ ते ५ या वेळेत पोलीस स्टेशन ताररेम अंतर्गत गुंडम चुटवाई जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. चकमकीदरम्यान गोळी लागल्याने एका गावकऱ्याचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सहभागी असल्याने या आदिवासीला गोळ्या घातल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर गावकऱ्यांनी चकमक बनावट असल्याचे सांगत जवानांवर गावकऱ्याला गोळ्या घातल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा: NIA Arrest Female Naxal: एनआयने आवळल्या आहेत कुख्यात महिला नक्षलवाद्यांच्या मुसक्या