नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना आसाम पोलिसांनी आज नवी दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. अटकेपूर्वी विमानतळावर जोरदार नाट्य रंगले होते. काँग्रेस नेत्यांनी खेडा यांच्या अटकेला विरोध केला. पवन खेडा रायपूरला जात होते. रायपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन होणार आहे. दरम्यान, जेष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर सरन्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.
अटक करण्यापूर्वीच विमानातून उतरवले: अटक करण्यापूर्वी पोलिसांनी पवन खेडा यांना विमानातून उतण्यास सांगितले. स्वतः पवन खेडा यांनी याबाबत माहिती दिली. खेडा म्हणाले की, पोलिसांनी त्यांच्याकडे त्यांच्या सामानाची माहिती विचारली होती, पण त्यांनी सांगितले की, आपल्याकडे फक्त एक हँडबॅग आहे. यानंतर पोलिसांनी सांगितले की, ते प्रवास करू शकत नाहीत. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून खेडा यांना अटक केली.
दिल्ली विमानतळावर जमले काँग्रेसचे कार्यकर्ते: पवन खेडा यांच्या अटकेची बातमी काँग्रेसजनांना समजताच दिल्ली विमानतळावर ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी विरोध सुरू केला. संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी CISF तैनात करण्यात आले होते. विमानतळ पोलिसांसह डीसीपी स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, आसाम पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पवन खेडा यांना अटक करण्यात मदत करण्याची विनंती केली होती. विमानतळावर आसामचे पोलिस अधिकारीही उपस्थित होते. मात्र, या संपूर्ण घटनेशिवाय विमानतळावरील परिस्थिती सामान्य आहे.
वॉरंट दाखवण्यास पोलिसांचा नकार: काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, आम्हाला रायपूरला जाऊ दिले जात नाही. ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आसाम पोलिसांनी पवन खेडा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वॉरंट दाखवण्यास सांगितले असता पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. खेडा यांना अटक केल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी खेडा यांच्या अटकेविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
हा प्रकार म्हणजे ईडीच्या छाप्यासारखा: प्रत्युत्तरात काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, हे ईडीच्या छाप्यासारखे आहे. काँग्रेसच्या अधिवेशनाला आमचे नेते जाणार होते, पण त्यांना जाऊ दिले नाही, असे पक्षाने सांगितले. या हुकूमशाही वृत्तीचा खंबीरपणे सामना करणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होत आहे. त्यात खेडा सहभागी होणार होते मात्र तत्पूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते पवन खेडा: काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी एका पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच यावेळी बोलताना खेडा यांनी नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव घेताना नरेंद्र गौतमदास मोदी असे घेतले होते. या नावालाच आता आक्षेप घेण्यात आला असून, त्यावर खेडा यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. या वक्तव्यावर खेडा यांनी चुकून उल्लेख झाल्याचे सांगत माफीही मागितली होती.