हैदराबाद - कधी काय घडेल, काहीच सांगता येत नाही. जगात अशाही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण होऊन जात. तेलंगाणामध्ये एका कोंबड्याला हत्या प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गोष्टीवर तुमचा अजिबातच विश्वास बसणार नाही. मात्र, ही सत्य घटना आहे.
तेलंगाणाच्या जगतियाल शहरातील लोथुनूर गावात कोंबड्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला. त्याचे झाले असे की, तेलंगाणामध्ये संक्रातीनंतर मोठा उत्साह पहायला मिळतो. काही लोक कोंबड्यांची झुंज लावतात. अशीच कोंबड्यांची झुंज लोथुनूर गावात तनुगुला सतीश या व्यक्तीने आयोजित केली होती. यावेळी कोंबड्याच्या पायाला चाकू बांधताना तो चाकू चुकून सतीशच्या गुप्तांगाला लागला. यावेळी स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले.
कोंबड्याच्या झुंजीमध्ये विरुद्ध बाजूच्या कोंबड्याला जखमी करून पराभूत करण्यासाठी कोंबड्याच्या पायाला धारदार ब्लेड, किंवा छोटा चाकू लावला जातो. यामुळे बहुतांशी वेळा कोंबड्याच्या झुंजीतील एक कोंबडा मृत्यूमुखी पडतोच.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने बंदी घातली असतानाही कोंबड्यांची झुंज सुरू होती. पोलिसांनी कारवाई करत संबंधित कोंबड्याला अटक करत. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा कोंबड्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ठाण्यात नेले आहे.