हैदराबाद : Pola 2023 आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्याची परंपरा आहे. यापैकीच एक सण म्हणजे बैलपोळा. दरवर्षी श्रावण अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. याला 'पिठोरी अमावस्या' असंही म्हणतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून या दिवशी आराम दिला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळतं. महाराष्ट्रात 'बैलपोळा' साजरा केला जातो. शेतकरी बांधव 'बैलपोळा' सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. बैलपोळा सणाचं महत्व जाणून घ्या.
काही भागात दोन दिवस साजरा होतो सण : कृषिप्रधान भारतात बळीराजा अर्थात शेतकऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वार्थाने अन्नदाता असलेल्या बळीराजाला त्याच्या बैलाइतकं क्वचितच कुणी प्रिय असेल. शेतकऱ्यासाठी बैल जनावर नसून त्यांच्या कुटुंबातला सर्वात महत्त्वाचा घटक असतो. ज्याच्यावर पुत्रवत प्रेम शेतकरी कुटुंब करतं, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला ते कसं विसरेल? बैलपोळा हा बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष सण आहे. बैल वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला असतो. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. 'बैलपोळा' म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवतात. हा दिवस 'तान्हा पोळा' म्हणून साजरा केला जातो.
असा साजरा केला जातो बैलपोळा : या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेक देतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या कुवतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधलं जातं. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणले जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येतं.
बैल पोळ्याचं महत्व : आज कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्त्व अजूनही तितकंच आहे. शेतकर्याबरोबर वर्षभर शेतात राबणार्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात 'पिठोरी अमावस्ये'च्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना सन्मानपूर्वक आवतण देण्यात येतं. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. यादिवशी कुटुंबातल्या इतर कोणत्याही सदस्यापेक्षा बैलाला जास्त महत्त्व दिलं जातं.
हेही वाचा :