नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता 14 मे रोजी शेतकऱ्यांना देणार आहे. मोदी 9.5 कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 19 हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान-किसान सन्मान निधी निधीची रक्कम जाहीर करतील आणि लाभार्थ्यांशी संवाद साधतील. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर या वेळी उपस्थित राहतील. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीमार्फत जमा केली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये शेतकरी कुटुंबांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
यापूर्वी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने शेतकरी संवाद अभियान राबवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते.
काय आहे शेतकरी सन्मान निधी योजना?
पीएम किसान योजना अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आतापर्यंत 96 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. या योजनेचं वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतकं आहे.
पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग -
शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.
हेही वाचा - ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्राने सबसीडीची घोषणा करावी - नवाब मलिक