नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टीका केली. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, काही देश दहशतवादाचा वापर सीमापार त्यांच्या धोरणांचे साधन म्हणून करतात. तसेच ते दहशतवाद्यांनाही आश्रय देतात. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आदी सहभागी झाले होते.
'दहशतवाद जागतिक शांततेसाठी मोठा धोका' : मोदी म्हणाले की, 'दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका आहे. हे आव्हान पेलण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे. दहशतवाद कोणत्याही स्वरूपाचा असो, त्याच्याविरुद्ध आपल्याला एकत्रितपणे लढायचे आहे. पाकिस्तानचा अप्रत्यक्ष संदर्भ देत ते म्हणाले की, काही देश सीमापार दहशतवादाचा वापर हत्यार म्हणून करतात. ते दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा देशांवर टीका करण्यास एससीओने अजिबात संकोच करू नये'.
'भारताचे अफगाणिस्तानच्या विकासात मोठे योगदान' : अफगाणिस्तानचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'अफगाणिस्तानबाबत भारताच्या चिंता आणि अपेक्षा बहुतेक SCO देशांसारख्याच आहेत. अफगाणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील'. ते म्हणाले की, 'भारत आणि अफगाणिस्तानमधील लोकांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये भारताने अफगाणिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे'.
SCO महत्त्वाचा आर्थिक आणि सुरक्षा गट मानला जातो : पंतप्रधान म्हणाले की, भारताने SCO मध्ये सहकार्याचे पाच नवीन स्तंभ तयार केले आहेत. यात स्टार्टअप आणि इनोव्हेशन, पारंपारिक औषध, डिजिटल समावेशकता आणि युवा सक्षमीकरण व समान बौद्ध वारसा यांचा समावेश आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये भारत, रशिया, चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. हा एक महत्त्वाचा आर्थिक आणि सुरक्षा गट मानला जातो.
शिखर परिषदेची मुख्य थीम : गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी समरकंद शिखर परिषदेदरम्यान भारताने SCO चे अध्यक्षपद स्वीकारले होते. या गटाच्या दोन संस्थांचे प्रमुख - सचिवालय आणि SCO रीजनल अँटी टेररिझम स्ट्रक्चर (SCO RATS) - देखील मंगळवारी झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते. या शिखर परिषदेची मुख्य थीम 'सुरक्षित SCO च्या दिशेने' आहे.
हेही वाचा :