भोपाळ : मध्यप्रदेशात 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावरून विरोधी एकजुटीवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या निशाण्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचे कुटुंब होते. परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबासह शरद पवार यांचेही नाव घेतले. शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा, असे मोदी म्हणाले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घोटाळ्यांची यादी सांगताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
'राष्ट्रवादीचा घोटाळ्याचा मीटर कधीच खाली जात नाही' : बूथ वर्कर कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या विरोधी एकजुटीवर सडकून टीका केली. विरोधी पक्ष एकत्र येण्याचे कारणही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणामध्ये मोदी प्रादेशिक राजकारण करणाऱ्या पक्षांवर अधिक आक्रमक होताना दिसले. भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांनी राष्ट्रवादीसारख्या पक्षांचा ठळकपणे उल्लेख केला. राष्ट्रवादीचा उल्लेख करत ते म्हणाले की, राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, महाराष्ट्र सिंचन घोटाळा, बेकायदेशीर खाण घोटाळा इत्यादी घोटाळ्यांचा उल्लेख केला. राष्ट्रवादीला टोला लगावताना ते म्हणाले की, हा असा पक्ष आहे ज्याचा घोटाळ्याचा मीटर कधीच खाली जात नाही.
'तर राष्ट्रवादीला मत द्या' : परिवारवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह सर्व मोठ्या पक्षांचा उल्लेख केला. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्हाला कोणाचे भले करायचे आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे. बूथ कार्यकर्त्यांप्रमाणेच जनतेला कोणाचे कल्याण हवे आहे, हा संदेश जनतेपर्यंत जायला हवा, असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या मुलीचे कल्याण करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या. पण तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि मुला मुलीचे कल्याण करायचे असेल तर भाजपला मतदान करा, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा :