कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हटवत सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला आहे. पंतप्रधान मोदींना आज राज्यातील पुरुलिया येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी बंगाली भाषेतून भाषणाला सुरवात केली.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- देशात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला संबोधित करण्याचे सौभाग्य मिळाले, असे मोदी म्हणाले. भगवान राम आणि सीताचे पुरूलियाशी जुने नाते आहे, असल्याचेही त्यांनी म्हटलं.
- पुरुलियामधील पाणी समस्येवर त्यांनी भाष्य केले. पाण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे ते म्हणाले. डाव्या पक्षाच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या सरकारने या भागाचा विकास केला नाही. पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात. त्या मी जाणून आहे. देशातील सर्वांत मागास भाग म्हणून टीएमसीने पुरुलियाची बदनामी केली आहे. दीदींने आपल्या कामांचा हिशोब द्यावा, असे ते म्हणाले.
- पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सत्ता आल्यानंतर सर्व समस्या दूर केल्या जातील. राज्यात डबल इंजीनचे सरकार आल्यानंतर येथे विकास होईल आणि तुमचे जीवन सरळ होईल. कृषी आधारीत उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. हस्तकलाकारांनाही संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
- दिल्लीत राहूनही मला पश्चिम बंगालमधील समस्या माहिती आहे. येथील युवकांचे हक्क हिसकावून इतरांना देण्यात येत आहेत. ओबीसी समुदायासोबत विश्वासघात झाला आहे. माँ-माटी-मानुष ही घोषणा करणाऱ्या टीएमसीने गरिबांचे हक्क हिसकावले आहेत. कोळसा माफियांना दीदींने संरक्षण दिले आहे. आपल्या फायद्यासाठी दीदींने माओवाद्यांना संरक्षण दिले आहे. याचे नुकसान मात्र, तुम्हा सर्वांना सहन करावे लागत आहे.
- तृणमूलचा पराभव होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे काहीच दिवस उरले आहेत. हे दीदींनी जाणून आहेत. म्हणून 'खेला होबे' असे त्या म्हणत आहेत. जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्यास खेळ खेळले जात नाहीत, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी आसाम-बंगाल दौऱ्यावर; भाजपाचा करणार प्रचार