नवी दिल्ली - येत्या 21 जूनला होणाऱ्या 'जागतिक योग दिवसा'निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 च्या मुख्य कार्यक्रमाचं दूरदर्शन वरून थेट प्रसारण केले जाणार आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या सकाळी साडे सहा वाजता या प्रसारणाला सुरुवात करतील. उत्तम तब्येतीसाठी योग या संकल्पनेसह आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
योगासनानंतर सकाळी सात वाजल्यापासून पावणे आठ वाजेपर्यंत पंतप्रधान संबोधित करतील. सुरक्षिततेच्या कारणास्तव लाखो लोक आपल्या घरातूनच योगासनं करून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळेच, याआधी साजऱ्या केल्या गेलेल्या योग दिवसांप्रमाणे एकत्र येऊन योगाभ्यास न करता, लोकांना आपापल्या घरातच योगासने करण्याचे आवाहन यावर्षी करण्यात येत आहे.
यंदाच्या योग दिनानिमित्त भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर उमटवण्यासाठी विशेष कॅन्सलेशन शिक्का जारी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन-2021 म्हणजे सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा शिक्का वापरला जाणार आहे. या टपाल उपक्रमात विशेष चित्ररुपी शिक्क्याचा वापर भारतातील 810 मुख्य टपाल कार्यालयात करण्यात येईल. आत्तापर्यंतच्या टपाल संबंधित उपक्रमांपैकी हा सर्वात मोठा उपक्रम असेल.
आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी...
योगाभ्यासाची सुरूवात ही हजारो वर्षांपूर्वीच झाल्याचे मानले जाते. शंकराला पहिला योगी म्हणजेच आदीयोगी मानले जाते. स्वामी विवेकानंद यांची कीर्ती जगभरात पसरल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये लोकांनी विशेष रुची दाखवायला सुरूवात केली. योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 27 सप्टेंबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर दरवर्षी 21 जूनला 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात येतो.