नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कर विजेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 2021 या वर्षाच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातल्या 32 मुलांची निवड केली आहे. यावेळी महिला आणि बालविकास मंत्रीही उपस्थित असणार आहेत.
केंद्र सरकार मुलांकडे राष्ट्र निर्मितीतील महत्वाचे भागीदार म्हणून पाहते. या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता, समाजसेवा, कला आणि संस्कृती, क्रीडा आणि शौर्य या सारख्या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्यांना सरकार दरवर्षी हे पुरस्कार देते.
2020 राष्ट्रीय बाल पुरस्कार -
गेल्या वर्षी राष्ट्रपतींनी 22 जानेवारी 2020 रोजी 49 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले होते. विविध राज्यांमधील या 49 विजेत्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेशाच्या प्रत्येकी एका मुलाचा समावेश आहे. ही मुले कला आणि संस्कृती, नाविन्यपूर्ण संशोधन, शैक्षणिक, सामाजिक सेवा, क्रीडा आणि शौर्य या क्षेत्रातील विजेते होते.