लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपा येत्या २५ डिसेंबरला किसान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यादिवशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती असते, यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील कार्यालयाने याबाबत माहिती दिली.
२,५०० ठिकाणी होणार प्रक्षेपण..
भाजपाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये तब्बल २,५०० ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाईल. यादृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि पक्षाचे नेते राधामोहन सिंह यांनी याबाबत सांगितले.
मोदी सरकार शेतकरी हितासाठी काम करत राहील..
राधामोहन सिंह यावेळी म्हणाले, की मोदी सरकार हे कायमच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहील. मोदींनी शेतकरी हितासाठी जेवढे काम केले आहे, तेवढे मागील सरकारच्या काळात झाले असते तर आज शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक चांगली असती, असेही ते म्हणाले. तसेच, विरोधी पक्ष शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविरोधात भडकावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
२४ दिवसांपासून सुरुये शेतकऱ्यांचे आंदोलन..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २४ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये येण्यास मज्जाव केल्यामुळे शेतकरी आंदोलक हे दिल्लीच्या सीमांवरच थांबून आहेत. आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा बंद केल्या असून, जोपर्यंत सरकार कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आपण इथेच आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही; शेतकरी संघटनांचे मोदी आणि तोमर यांना पत्र