नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. राज्यांमधील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. व्हर्चुअल पद्धतीने ही बैठक पार पडणार आहे. काही राज्यांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
यापूर्वी जानेवारीमध्ये झाली होती बैठक..
कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांनी वेळोवेळी अशा प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यापूर्वी त्यांनी जानेवारीमध्ये अशा प्रकारची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी राज्ये कितपत तयार आहेत याचा आढावा घेतला होता. तसेच, लसीकरणाच्या टप्प्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट..
दरम्यान, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनसारखे निर्बंध काही प्रमाणात लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा : भारत बायोटेकची 'इंट्रानॅसल लस'; शरीरावर नेमकी कसे काम करते; घ्या जाणून