हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच ते तेलंगणामध्ये सुमारे 11,355 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत.
तिरुपतीचा प्रवास 3 तासांनी कमी होईल : केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या कार्यालयातून रविवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान तेलंगणातील सिकंदराबाद आणि शेजारच्या आंध्र प्रदेशातील तिरुपती दरम्यान रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. देशात सुरू होणारी ही 13 वी वंदे भारत ट्रेन असेल. सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 12 तासांवरून 8.5 तासांवर येण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले आहे. तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांदरम्यान धावणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल. 15 जानेवारी रोजी मोदींनी सिकंदराबाद आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या दोन शहरादरम्यान वंदे भारत ट्रेनला डिजिटली हिरवा झेंडा दाखवला होता. दोन राज्यांना जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस होती.
विविध विकास कामांचे भूमिपूजन : पंतप्रधान मोदी सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी 715 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजनही करणार आहेत. यात पुढील 40 वर्षांच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुविधांचा समावेश आहे. तसेच मोदी सिकंदराबाद - महबूबनगर रेल्वे मार्गावरील 1,410 कोटी रुपये खर्चून 85 किमी लांबीच्या सेक्शनचे दुहेरीकरणही राष्ट्राला समर्पित करतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पंतप्रधान 13 नवीन मल्टी - मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टम (MMTS) सेवांचेही उद्घाटन करतील, ज्या एमएमटीएस फेज - II चा भाग म्हणून हैदराबादच्या उपनगरात बांधलेल्या नवीन रेल्वे मार्गावर धावतील.
सहा राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी : परेड ग्राऊंडवर जाहीर सभेत मोदी 7,864 कोटी रुपये खर्चून राज्याच्या विविध भागांना जोडणाऱ्या सहा राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी करतील. पंतप्रधान ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), बीबीनगर येथे 1,366 कोटी रुपये खर्चाच्या नवीन ब्लॉकचे भूमिपूजन देखील करतील, असे म्हटले आहे.
हेही वाचा : Kozhikode Burning Train : कोझिकोडमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार! तीन जणांचा जळून मृत्यू