बंगळुरू: पंतप्रधान मोदींचा बंगळुरूमधील रोड शो दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूचे संस्थापक केम्पेगौडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून रोड शोला सुरुवात केली आहे. हा रोड शो मध्य बंगळुरूच्या काही भागांतून पाच विधानसभा क्षेत्रांमधून जाणार आहे.
खास डिझाईन तयार केलेले वाहन- पंतप्रधानांच्या रोड शोसाठी खास डिझाईन तयार केलेले वाहन आहे. या वाहनात पंतप्रधानांसोबत कर्नाटकचे राज्यसभा सदस्य असलेले केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि बंगळुरू मध्यवर्ती खासदार पी सी होते. रस्त्याच्या कडेला हजारो लोक जमा होणार असल्याने यापूर्वी बॅरिकेड्स उभारण्यासारखी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आहे.
भाजपने रस्त्याच्या दुतर्फा झेंडे लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. पक्षाच्या हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांनीही भगवी शाल आणि टोप्या परिधान केल्या आहेत. आज होणार्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ची परीक्षा लक्षात घेऊन, भाजपने शुक्रवारी मोदींच्या बंगळुरूमधील दोन दिवसीय रोड शोमध्ये आज छोटासा बदल केला आहे. सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एकाच दिवशी रोड शो न घेता दोन दिवस रॅली घेण्यात आली आहे.
उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस- बंगळुरू रोड शोनंतर पंतप्रधान मोदी म्हैसूर जिल्ह्यातील शिवमोग्गा आणि नांजनगुड येथील परिषदांना उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते नांजनगुडू श्रीकंठेश्वर मंदिरात विशेष पूजा करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या (८ मे) हा शेवटचा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे.
असा आहे रोड शोचा मार्ग- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो हा न्यू थिप्पासंद्र रोड, बंगळुरू येथील केम्पेगौडा पुतळ्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर रोड शो हा एचएएल दुसरा फेज 80 फूट रोड जंक्शन, 12 वा मेन रोड जंक्शन, 100 फूट जंक्शन, इंदिरा नगर, सुब्रमण्यस्वामी मंदिर मार्गे एमजी रोडवर पोहोचणार आहे. पंतप्रधानांचा रोड शो हा ट्रिनिटी सर्कल येथे समाप्त होणार आहे. शनिवारी पंतप्रधानांनी बंगळुरूच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात 26 किमीचा रोड शो केला होता.
सभा सुमारे 100 एकर जागेत होणार-बंगळुरूच्या रोड शोनंतर पंतप्रधान मोदी शिवमोग्गा जिल्ह्यात जाणार आहेत. शिवमोग्गा तालुक्यातील अयानुरू येथील शासकीय प्री-ग्रॅज्युएशन कॉलेजजवळील भाजपच्या प्रचार सभेत ते सहभागी होणार आहेत. ही सभा सुमारे 100 एकर जागेत होणार असल्याचे शिवमोगा जिल्हा भाजप अध्यक्ष टी.डी.मेघराज यांनी सांगितले. ही सभा दुपारी 2.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. भाजपच्या दाव्यानुसार पंतप्रधान मोदी 50 मिनिटे भाषण करणार आहेत.
पंतप्रधान सभेला तीन लाख लोक येण्याचा अंदाज- मोदी शिवमोग्गा जिल्ह्यातील 7 मतदारसंघ, दावणगेरेमधील 2 मतदारसंघ आणि चिक्कमगालुरूमधील एका मतदारसंघातील उमेदवारांच्यावतीने प्रचार करणार आहेत. पंतप्रधानांच्या सभेत 10 मतदारसंघातील मतदार सहभागी होत आहेत. प्रत्येक मतदारसंघातील 30 हजार लोकांसह सुमारे तीन लाख लोक सामील होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. सभेला येणाऱ्या मतदारांसाठी अयानुरुच्या बाहेर वाहने पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
एलाचेगेरे बोर गावात खुली प्रचार सभा - पंतप्रधान म्हैसूर जिल्ह्यातील नांजनगुडू तालुक्यातील एलाचेगेरे बोर गावात खुली प्रचार सभा घेणार आहेत. या कार्यक्रमात 1 लाख लोक सहभागी होणार आहेत. आमदार एस. ए. रामदास यांनी सांगितले की, कार्यक्रमापूर्वी रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीत 3,000 हून अधिक दुचाकीस्वार सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजून 35 वाजता मंचावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी श्रीकंठेश्वर स्वामी मंदिरालादेखील भेट देणार आहेत.