नवी दिल्ली - कोरोना महामारीत लोकांचे प्राण वाचविण्याकरिता योगदान दिल्याबद्दल डॉक्टरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्याविरोधात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांकरिता तरतूद करून महत्त्व दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. ते राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त बोलत होते.
अनेक दशके यापूर्वीच्या काळात वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, की आपल्या देशात लोकसंख्येच्या दबावामुळे आव्हाने अधिक अवघड होतात. असे असले तरी देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण कमी राहिले आहे. या प्रमाणाचे व्यवस्थापन हे विकसित देशांच्या तुलनेत अधिक शक्य आहे.
संबंधित बातमी वाचा-Doctors Day 2021 : आज डॉक्टर्स डे, जाणून घ्या का साजरा करतात...
लाखो लोकांचे प्राण वाचविण्याचे श्रेय हे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे!
एखाद्याचे व्यक्तीचे आयुष्य गमाविणे हे दु:खदायी घटना असते. मात्र, देशाने कोरोनापासून लाखो लोकांचे प्राण वाचविले आहेत. याचे मोठे श्रेय हे परिश्रम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
हेही वाचा-सुपारी तस्करी प्रकरण: 19 ठिकाणी सीबीआयची छापेमारी, हजारो कोटींचा कर चुकवल्याची चौकशी सुरू
आरोग्य क्षेत्राकरिता यावर्षी २ लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद
कोरोना विषाणु नवीन आणि सतत रुप बदलणारा आहे. भारतीय डॉक्टर हे त्यांचे ज्ञान आणि अनुभवाचा वापर करून आव्हानांशी लढत आहेत. पहिल्या लाटेत आरोग्य क्षेत्राकरिता सरकारने १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. या वर्षी २ लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
हेही वाचा-"डॉक्टर डे"लाच पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या, काही महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
सरकार हे डॉक्टरांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध
देशात २०१४ पर्यंत केवळ सहा एम्स होते. गेल्या सात वर्षात आणखी १५ एम्स सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची दीडपटीने वाढली आहे. आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांची कर्जहमी योजना जाहीर केली आहे. आमचे सरकार हे डॉक्टरांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यासाठी डॉक्टरांविरोधात गुन्हे करणाऱ्यांविरोधात अनेक कायदेशीर तरतूदी करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
म्हणून देशात १ जुलैला साजरा होतो राष्ट्रीय डॉक्टर्स डे..
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मानार्थ १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
केंद्र सरकारने १९९१ ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन असतो. तर, अमेरिकेत ३० मार्च, क्युबामध्ये ३ डिसेंबर आणि इराणमध्ये २३ ऑगस्ट हा डॉक्टर दिन असतो.