रांची : झारखंडमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. मात्र, मोदींनी या फोन कॉलवर केवळ 'मन की बात' केली, अशी टीका सोरेन यांनी केली आहे.
"पंतप्रधानांनी आज फोन केला होता. संपूर्ण वेळ त्यांनी केवळ त्यांच्या 'मन की बात' ऐकवली. जर त्यांनी थोडे ऐकूनही घेतले असते, आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली असती, तर बरं झालं असतं" अशा आशयाचे ट्विट सोरेन यांनी केले.
मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केली होती चर्चा..
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि पुद्दुचेरी व जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर्ससोबत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्यासोबतही फोनवर चर्चा केली होती.
झारखंडमध्ये येणाऱ्यांची चाचणी अनिवार्य..
दरम्यान, झारखंडमध्ये होत असलेल्या कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारने नवे नियम लागू केले आहेत. इतर राज्यांमधून परतणाऱ्या स्थलांतरीत कामगारांना आता राज्यामध्ये आल्यानंतर कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच त्यांना एक आठवडा विलगीकरणात रहावे लागणार आहे.
हेही वाचा : आता करा 'ड्राईव्ह इन' लसीकरण; कच्छ प्रशासनाचा उपक्रम