नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केलं. 'मन की बात'चा (PM Modi Mann Ki Baat) हा 104 वा भाग होता. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात चंद्रयान 3 च्या यशाने केली. पंतप्रधान म्हणाले, भारताच्या चंद्रयानानं सिद्ध केलं की संकल्पातील काही सूर्य चंद्रावरही उगवतात. मिशन चंद्रयान एका नवीन भारताच्या भावनेचं प्रतिक बनलं आहे. ज्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत कसं जिंकायचं हे देखील माहित असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.
मिशन चंद्रयान स्त्री शक्तीचं उदाहरण : पुढे बोलताना चंद्रयान मोहिमेबाबत पंतप्रधान म्हणाले, मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 'मी' लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो की, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. भारताचं मिशन चंद्रयान देखील स्त्री शक्तीचं जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला शास्त्रज्ञ, अभियंत्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. भारतीय महिला अवकाशालाही आव्हान देत आहेत, ज्या देशातील महिला इतक्या महत्त्वाकांक्षी असतात त्या देशाचा विकास होण्यापासून कोणीही रोखणार नाही.
1959 नंतर प्रथमच खेळांमध्ये 26 पदके : खेळांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी चीनमध्ये जागतिक विद्यापीठ खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. या खेळांमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. आमच्या खेळाडूंनी एकूण 26 पदकं जिंकली, त्यापैकी 11 सुवर्ण पदकं होती. 1959 पासूनच्या सर्व जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये जिंकलेल्या सर्व पदकांची बेरीज केली तरी ही संख्या केवळ 18 वर येते. मात्र, यावेळी आमच्या खेळाडूंनी 26 पदकं जिंकली, त्यांचा देशाला अभिमान आहे.
G-20 समिटसाठी भारताची तयारी : G-20 बाबत पंतप्रधान म्हणाले, पुढील महिन्यात होणाऱ्या G-20 लीडर्स समिटसाठी भारत तयारी करत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 40 देशांचे प्रमुख, अनेक जागतिक संस्था राजधानी दिल्लीत येत आहेत. जी-20 बैठकीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतानं G-20 ला अधिक समावेशक बनवलं आहे. भारताच्या निमंत्रणावरून आफ्रिकन संघही G-20 मध्ये सामील झाला आहे. आफ्रिकेतील लोकांचा आवाज आता जगाच्या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
हेही वाचा -