नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बातचा आज शंभरावा भाग प्रक्षेपित झाला आहे. हा भाग देशभरातील आकाशवाहिनीवरून सकाळी 11 वाजता प्रक्षेपित झाला आहे. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात माझ्यासाठी पूजा आणि व्रत असल्याचे म्हटले आहे. मन की बातचा शंभरावा भाग असल्याने दिल्लीतील दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ऑक्टोबर 2014 मध्ये विजया दशमीच्या दिवशी सुरू झालेला 'मन की बात' हा कार्यक्रम जनतेसाठी सकारात्मकतेचा अनोखा उत्सव झाला आहे .या कार्यक्रमाची प्रत्येज जण दर महिन्याला वाट पाहत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ते मन की बातच्या शंभराव्या कार्यक्रमात बोलत होते. आपण सर्वांनी मिळून 3 ऑक्टोबर 2014 रोजी, विजया दशमी सणाच्या दिवशी, 'मन की बात'चा प्रवास सुरू केला. विजया दशमी हा दुष्ट शक्तीवर चांगल्या शक्तीने विजय मिळविण्याचा उत्सव आहे. मन की बात कार्यक्रम म्हणजे आपण सकारात्मकता साजरी करतो. लोकांकडून हजारो पत्रे आणि संदेश मिळाल्यानंतर भावनिक होत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.
22 भारतीय भाषांमध्ये कार्यक्रमाचे प्रक्षेपण- मन की बात हा कार्यक्रम 22 भारतीय भाषा आणि 29 बोलीमध्ये प्रक्षेपित केला जातो. त्या व्यतिरिक्त, फ्रेंच, चीनी, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो. लाल किल्ल्यावर देशाच्या अनेक भागांतून आलेल्या लोकांनी सेल्फी पॉईंट्समध्ये थांबून आपले मनोगत व्यक्त केले. आतापर्यंत ९९ भागांच्या रेकॉर्डिंगसाठी पाच ऑडिओ बूथ तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी लोक त्यांचा आवडता एपिसोड ऐकू शकतात. यासोबतच आपले मतदेखील व्यक्त करू शकतात. हर्षित जैन म्हणाले, की येथे येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षक देशराज यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये सांगितलेल्या युक्तीमुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
मन की बातसाठी भाजपकडून तयारी सुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातचा 100 वा भाग मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी भाजपकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. मन की बातच्या 100 व्या पर्वाबाबत दिल्ली भाजपने वेगळी रणनीती तयार केली आहे. या अंतर्गत पक्षाचे सर्व नेते आपापल्या भागातील सामान्य जनतेला एकत्र करून मन की बातचा हा भाग ऐकणार आहेत. त्यातील संदेशावरही चर्चा करणार आहेत. दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघात 827 ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रम ऐकायला मिळणार आहेत.दिल्लीत बूथ स्तरावर पंतप्रधान आणि पक्षाशी संबंधित कार्यक्रम साजरे करण्याची जबाबदारी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असली पाहिजे, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. असे केल्याने केवळ बूथ बळकट होणार नाही, तर पक्षाची निवडणुकीची तयारी होणार असल्याची भाजपच्या नेत्यांचे मत आहे.
कधीपासून सुरू झाली मन की बात- 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसहभागाशी संबंधित अनेक योजना सुरू केल्या आहेत. ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधानांनी आकाशवाणीवर मन की बात या नावाने प्रसारित होणारा कार्यक्रम सुरू केला. याद्वारे पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना संबोधित केले होते. तेव्हापासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ही मालिका सुरू झाली. यापूर्वी, मार्चच्या शेवटच्या रविवारी मन की बातचा 99 वा भाग प्रसारित झाला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी 100 व्या एपिसोडमध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा यावर देशातील जनतेकडून सूचना मागवल्या होत्या.