नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चक्रीवादळ 'यास' ने प्रभावित झालेल्या भागांच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि मदतकार्यासाठी त्वरित 1 हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. पीएम मोदी यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या बाधित भागाचे सर्वेक्षण केले.
केंद्र सरकार एक आंतर-मंत्रालयीन गटही स्थापन करणार असून हा गट बाधित भागाची पाहणी करेल आणि नुकसानीचा संपूर्ण आढावा घेईल. केंद्र सरकारने बाधित भागातील रस्ता व पुलासारख्या पायाभूत सुविधांच्या सुरळीत कामकाजासाठी आणि दुरुस्तीसाठी पूर्ण मदतीची ग्वाहीही दिली आहे. वादळामुळे ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
ओडिशा राज्याला तत्काळ प्रभावाने 500 कोटी रुपये जारी करण्यात येणार आहेत. तर पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील नुकसान पाहता त्यांना 500 कोटी रुपये देण्यात येतील. दरम्यान, ओडिशा राज्यात चक्रीवादळामुळे तीन जणांचा तर पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. या वादळाचा कमीत कमी एक कोटी जणांना फटका बसला आहे, असा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे.
गुजरातला केली होती 1 हजार कोटींची मदत
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातला 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. चक्रीवादळाचा फटका गुजरातसह गोवा, महाराष्ट्राला बसला होता. मात्र, फक्त गुजरातला मदत केल्याने पंतप्रधान टीकेचे धनी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत ? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? असा प्रश्न कॅाग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.