नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' ( PM Modi in Mann Ki Baat ) कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. कार्यक्रमाचा हा 86 वा भाग होता. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात. आजच्या कार्यक्रमात मोदींनी सर्व मराठी बंधु भगिनिना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी 'व्होकल फॉर लोकल', चोरीला गेलेल्या मुर्त्या, आंतरराष्ट्रीय महिला दिन, आयुर्वेद आणि स्टार्ट-अप्सवर भाष्य केलं.
'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे -
भारताने इटालीतून आपली एक बहुमूल्य असा वारसा असलेली अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ती आणण्यात आली आहे. या मूर्तिंमध्ये भारताचा आत्मा, श्रद्धेचा अंश आहे. या मूर्तिंचे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वही आहे, असे मोदी म्हणाले. आपण काही दिवसांपूर्वीच काशीहून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ति सुद्धा परत आणली गेली होती, हेही मोदींनी सांगितले.
टांझानियाचे किली पॉल आणि त्यांची बहिण नीमा यांचे मोदींनी आपल्या भाषणात कौतूक केले. भारतीय संगीताच्या जादूने अनेकांना भुरळ पाडली आहे. किली पॉल आणि त्यांची बहिण नीमा भारतीय संगितावर लिप्सींग करतात. तसेच भारतीय नागरिक आपल्या इतर राज्यातील भाषांवर लिप्सींग करू शकतात, असे मोदी म्हणाले.
गुजराती मुलं तमिळ गीतांवर तसं करू शकत नाही का? केरळची मुलं आसामी गीतांवर, कन्नड मुलं जम्मू-कश्मिरच्या गीतांवर लिप सिंक करू शकतात. असं एक वातावरण आपण बनवू शकतो, ज्यात एक भारत-श्रेष्ठ भारतचा अनुभव आम्ही घेऊ शकतो, असे मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. मी मातृभाषेबद्दल इतकंच म्हणेन की, जसं आपली आई आपलं जीवन घडवत असते, तसंच आपली मातृभाषा आपलं जीवन घडवत असते. आई आणि मातृभाषा, दोन्ही मिळून जीवनाचा पाया मजबूत करतात, चिरस्थायी करतात. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, तसंच आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही, असे मोदी म्हणाले.
भाषा ही केवळ अभिव्यक्तिचं माध्यम नाही तर भाषा, समाजाची संस्कृति आणि परंपरांना वाचवण्याचं काम करत असते. २०१९ मध्ये, हिंदी जी जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ती भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. याचाही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. तसेच आज २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. सर्व मराठी बंधु भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे ते म्हणाले.
आजचा दिवस मराठी कविवर्य विष्णु वामन शिरवाडकरजी, कुसुमाग्रज यांना समर्पित आहे. आजच कुसुमाग्रज यांची जयंतीही आहे. कुसुमाग्रज यांनी मराठीमध्ये कविता केल्या, अनेक नाटकं लिहीली आणि मराठी साहित्याला नवी उंची दिली, असे मोदी म्हणाले.
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा आयुर्वेदाचे मोठे चाहते आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते आयुर्वेदाचा उल्लेख नक्कीच करतात. भारतातील अनेक आयुर्वेदिक संस्थांचीही त्यांना माहिती आहे. गेल्या सात वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे आपली पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती लोकप्रिय करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे, असे मोदी म्हणाले.
आजपासून अवघ्या काही दिवसांनी 8 मार्च रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन'साजरा केला जाणार आहे. हेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा लहान-मोठे उद्योग असो, सर्वत्र क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे, असे मोदींनी म्हटलं.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.