नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितले, की येत्या काही आठवड्यांमध्येच कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. यासोबतच, देशात लसीकरण करताना वयोवृद्धांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करत असल्याचेही ते म्हणाले.
वैज्ञानिक दृष्टीकोन आणि एकमेकांचे सहकार्य आवश्यक..
सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान म्हणाले, की कोरोनाच्या या लढाईत आपण नक्कीच जिंकू शकतो. संपूर्ण देशाच्या लसीकरणासाठी आपल्याकडे अनुभवी नेटवर्क उपलब्ध आहे. येत्या काही आठवड्यांमध्येच ही लस उपलब्ध होईल. यावर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये देशात अत्यंत भीतीचे वातावरण होते. मात्र, आता डिसेंबरमध्ये पाहिले तर, भविष्य अत्यंत आशादायी दिसत आहे. आपला हा प्रवास नक्कीच बिकट होता. त्यामुळे यापुढेही अशाच प्रकारे सकारात्मक वाटचाल करायची असेल, तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवत एकमेकांचे सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही मोदी म्हणाले.
सध्या जगभरातील लोक कमी किंमतीत जास्त परिणामकारक अशा लसीच्या शोधात आहे, आणि यासाठी त्यांच्या सर्व आशा भारतावरच टिकून आहेत. आज पार पडलेल्या बैठकीमध्ये सर्वांनी जो विश्वास दर्शवला आहे, तो पाहता या लढाईत आपण आणखी मजबूतीने पुढे जाऊ शकतो यावर मी ठाम आहे. यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती, लसीकरणासाठी विविध राज्यांच्या सरकारांकडून अनेक कल्पनाही मांडण्यात आल्या होत्या, ज्या नक्कीच चांगल्या होत्या, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : केरळ : चक्रीवादळ बुरेवी रामनाथपुरमवर स्थिर, 5 जिल्ह्यांत सार्वजनिक सुट्टी जाहीर