नवी दिल्ली - कोरोना संकटात पीएम केअर फंडातून वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. लस, ऑक्सिजन प्लांट आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पीएम केअर फंडाचा वापर करण्याचे निर्देश द्यावे, असे या याचिकेत म्हटलं आहे.
वकील विप्लव शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या उत्पादनात वापरल्या जाणार्या कोणत्याही उपकरणांची आयात शुल्क तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात यावी, असेही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.
पीएम केअर फंडचा वापर देशभरातील 738 जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन आणि लस इत्यादींच्या व्यवस्थेसाठी केला गेला पाहिजे. जेणेकरुन तिथे जे लोक सामान्य उपचार घेतात. त्यांना त्रास होऊ नये व विनाशुल्क उपचार घेता येईल, असेही याचिकेत विल्पव यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान केअर फंड -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी ठरत असून; ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीरअभावी कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशात सध्या दिवसाला सरासरी चार हजार रुग्णांचा मृत्यू होतो आहे. यामध्येच, गाजावाजा करत केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान केअर फंडाची निर्मिती करण्यात आली होती. कोविड 19 रोगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक वर्गातील नागरिक पंतप्रधान केअर फंडामध्ये हातभार लावत आहेत.