बंगळुरू : जनतेला जर राज्यात लॉकडाऊन नको असेल, तर कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ते डॉलर्स कॉलनीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
कर्नाटकात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर राज्यात लॉकडाऊन लागू व्हावा अशी जनतेची इच्छा नसेल, तर लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लोकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊनशिवायही कोरोनाला आळा घालणे शक्य होईल, असे येदीयुरप्पा यावेळी म्हणाले.
सीमेवरील निर्बंधांमध्ये वाढ..
दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे सीमा भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन लागू नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत आपण उद्या (सोमवारी) एक बैठक बोलावली असून, त्यामध्ये पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : राम मंदिरासाठी देणगी दिल्यानं उत्तर प्रदेशात मुस्लिम कुटुंबाला मारहाण