शुभ कार्यासाठी निषिध्द मानला जाणारा, परंतु धर्म कार्यासाठी पुण्यदायी मानला जाणारा पौष मास संपत आला. 21 जानेवारी रोजी 'पौष अमावस्या' आहे. ही अमावस्या पितरांचे स्मरण, पूजन या अर्थाने महत्वाची मानली जाते. ज्या पितरांमुळे आपले अस्तित्व, ओळख आहे, त्या पितरांप्रती कृतज्ञता मानण्याची ही चांगली संधी गमवू नये. त्यासाठी पौष अमावस्येत नैवेद्य, दोन हात आणि तिसरे मस्तक जोडून आपल्या पितरांना नमस्कार करायचा.
पौष अमावस्येचे महत्व : पौष अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राध्द कर्म आणि पिंड दान भक्तीभावाने केल्याने त्यांना या योनीतून मुक्ती मिळते आणि स्वर्गाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यात सूर्याची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. या अमावस्येला व्रत आणि पूजा केल्याने अनेक वेळा पुण्यप्राप्ती होते. तसेच घरात सुख-समृध्दी नांदते. पौष अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी व्रत ठेवणे देखील शुभ मानले जाते.
पितृश्राध्द, तर्पणविधी करा : पौष मासातील पौर्णिमे प्रमाणेच अमावस्या देखील धर्मकार्यासाठी एक पर्वणी मानली जाते. इतर अमावस्यांप्रमाणेच ह्या अमावस्येला देखील पितृश्राध्द, तर्पणविधी आवर्जून करावेत. या दिवशी केलेले पितृतर्पण, दान हे सारे शेवट पितरलोकातील आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी पूर्वावर श्रध्दा आहे.
पौषी अमावस्या महत्वाची : वास्तविक सर्वच अमावस्या या पितृकार्यासाठी योग्य मानल्या जातात. आपल्या धर्मशास्त्रानुसार पितृतर्पण रोज करावे, अशीही परंपरा आहे. काही लोक ते करतात देखील, मात्र ज्यांना त्यांच्या दैनंदिन व्यस्ततेमुळे असे करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान पौषी अमावस्येला न चुकता करावे. पितरांबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सहसा चुकवू नये.
बुकल अमावस्या : या अमावस्येला 'बुकल अमावस्या' असे असेही म्हणतात. या अमावस्येला दुधात तांदूळ घालून केलेली खीर पितरांसाठी वाढून ठेवावी. त्यामुळे पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. आपल्या वंशजांबद्दल पितरांना आस्था, प्रेम असणारच. त्यात आपल्या माणसांनी, मुलाबाळांनी आपली आठवण ठेवून खास खीर करून ती आपल्याला अर्पण केली, हे बघून पितर प्रसन्न होणार हे उघडच आहे. आपल्यालाही एक वेगळे, शब्दात सांगता न येणारे समाधान या विधीमुळे होते. यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाने शक्यतो या 'बकुल अमावस्येचा' विधी इतर पितर विधी प्रमाणेच मनातुन करण्यास विसरु नये.